आरक्षण विधेयकामुळे सरकार पुन्हा पेचात

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मतदानाच्या वेळी लाज राखणार्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांनी सरकारी नोकरीत पदोन्नतीसाठी आरक्षण ठेवण्याच्या विषयात सरकारची कोंडी केली आहे. हे विधेयक मंजूर न झाल्यास कडक भूमिका घेऊ असा इशारा बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे; तर हे आरक्षणाचे विधेयक आणल्यास सभागृहाचे कामकाज चालू न देण्याची धमकी सपचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी दिली आहे.

मुलायम आणि मायावती यांनी थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध असूनही या विधेयकाच्या वेळी सरकारची पाठराखण केली होती. आरक्षणाच्या मुद्द्याबाबत दोन्ही पक्ष आग्रही आणि आक्रमक आहेत. मायावतींना बढतीमध्ये आरक्षण हवे आहे; तर मुलायम यांना आपला उच्चवर्णीय मतदार खूष राखावयाचा असल्याने त्यांचा आरक्षणाला विरोध आहे.

आरक्षण विधेयकाच्या मुद्द्याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सरकारने हे विधेयक मंजूर करवून घेतले नाही; तर आम्हाला कडक भूमिका घ्यावी लागेल आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो; असा इशारा मायावती यांनी दिला आहे. समाजवादी पक्षाने या विधेयकामुळे समाजात फूट पडणार असल्याचा आरोप करून हे विधेयक संमत झाल्यास सभागृहाचे कामकाज एकाही दिवस चालू न देण्याचा इशारा दिला आहे. आपण काय करू याची झलक समाजवादी पक्षाने सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडून दाखवून दिली.

Leave a Comment