वॉलमार्ट, टेस्को स्टोअर्स सर्वप्रथम राजधानी दिल्लीत

नवी दिल्ली दि.१० – केंद्रसरकारने रिटेल क्षेत्रात थेट परकिय गुंतवणुकीस परवानगी दिल्यानंतर देशातील अशी जागतिक चेन स्टेाअर्स सर्वप्रथम राजधानी दिल्लीत सुरू होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दिल्ली सरकारने या संबंधीचे विधेयक मंगळवार पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे सांगितले आहेच पण रिटेल स्टोअर उघडण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सध्याच्या कलमात सुधारणाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा प्रथमपासूनच एफडीआयला पाठिबा आहे. मात्र सध्याच्या कायद्यातील तरतूदीनुसार शेतकरी थेट रिटेलरला आपला माल विकू शकत नाही तर त्याला माल अगोदर ठोक बाजारातच न्यावा लागतो. हा बाजार दलालांच्या ताब्यात आहे. ठोक व्यापार्यां्ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कायद्यात दुरूस्ती गरजेची आहे असे पार्लमेंटरी सचिव मुकेश शर्मा यांनी सांगितले.ते म्हणाले की आशियातील सर्वात मोठी फळ आणि भाजीपाला बाजार मंडी असलेल्या आझादपूर मंडीतही ठोक व्यापार्यां चेच वर्चस्व आहे तेही यामुळे मोडले जाणार आहे.

दिल्ली सरकार शेतीमालासाठी खासगी मार्केट यार्ड स्थापण्याचाही विचार करत असून येथे रिटेलर चेनवाल्या कंपन्या आपले कार्यालय सुरू करू शकणार आहेत. येथे शेतकरी आपला माल थेट आणून कंपन्यांना विकू शकणार आहेत असेही शर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment