अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

मुंबई दि.७ – सिंचन घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने तडकाफडकी राजीनामा देऊन मंत्रीमंडळातून बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सकाळी नऊ वाजता मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये त्यांना राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी शपथ दिली. या समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि पवार यांचे कुटुंबिय उपस्थित होते. भाजप सेना युतीने या शपथविधीवर बहिष्कार घातला होता तर राष्ट्रवादीचे अन्य बडे नेते तसेच काँग्रेसमधील नेतेही अनुपस्थित होते.

अजित पवार यांच्याकडे जलसंपदा विभागाचा कार्यभार असताना त्यांच्या कार्यकाळात कोकण आणि विदर्भातील अनेक सिचन प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि हा आकडा ३५ हजार कोटींचा असल्याचेही दावे केले जात होते. सध्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावरही आरोप केले गेले होते. विशेष म्हणजे त्याला मुख्यमंत्री चव्हाण यांनी उत्तर देताना चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर पवार यांनी तातडीने २५ सप्टेंबरला मंत्रीपदाचा तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

विरोधकांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाची कथित श्वेतपत्रिका तयार करण्यात आली आणि वास्तविक ती हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार होती मात्र अगोदरच सादर केली गेली. या पत्रिकेत जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराबाबत एकही शब्द नव्हता आणि तेव्हाच अजित पवार पुन्हा मंत्रीमंडळात येणार हे समजून चुकले होते. पवारांच्या शपथविधीने त्यांच्या समर्थकांत उत्साह असला तरी पक्षातील अन्य नेते नाराज आहेत असेही समजते.

Leave a Comment