शिल्पा शेट्टी झळकणार छोट्या पडद्यावर

लग्नानंतर बॉलीवूडपासून काहीशी दूर गेलेली शिल्पा शेट्टी येत्या काही दिवसातच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिने दिग्दर्शक साजिद खान आणि डान्स दिग्दर्शक टेरेंस लुईस छोट्या पडद्यावरील रियलिटी शो असलेल्या ‘नच बलिए’ यामध्ये जज म्हणून काम करताना दिसणार आहेत. लुईस आणि साजिदने याबाबत होकार दर्शविला असून त्यांच्या सोबत शिल्पा सुद्धा सहभागी होणार असल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती देताना लुईस म्हणाला की, ‘नच बलिए’ चा नवीन भाग येत आहे. हा भाग दोन वर्षच्या अंतरानंतर येत आहे. या प्रसिद्ध असलेल्या कार्यक्रमात मी साजिद आणि शिल्पाच्या सोबत सहभागी होणार आहे.’या कार्यक्रमाच्या गेल्या भागात फराह खान, करिश्मा कपूर आणि अर्जुन रामपाल यांनी निर्णायक रोल केला होता. ‘साजिद्स सुपरस्टार्स’ कार्यक्रमात होस्ट म्हणून काम केलेल्या साजिदने पण या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या कार्यक्रमापूर्वी शिल्पाने ‘झलक दिखला जा’ आणि ‘जरा नचके दिखा-२’ यामध्ये जज म्हणून काम पहिले आहे. तर त्याशिवाय ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचे होस्ट म्हणून तिने काम केले आहे. दोन वर्षापूर्वी राज कुंद्रा यांच्यासोबत लग्न केल्यानंतर ती सिनेसृष्टीपासून काहीसी दूर झाली होती.

Leave a Comment