केलॉग्ज, सफोला, कॉम्प्लान ब्रँडवर कारवाई

नवी दिल्ली दि.६ – प्रत्यक्षात कोणतेही प्रयोग न करता आणि ठोस निष्कर्ष नसतानाही आपल्या उत्पादनांबाबत खोटे दावे करणार्यात आणि जाहिरातीतून त्यांचा मुद्दाम उल्लेख करणार्यात नामवंत ब्रँडच्या उत्पादनांवर अन्न सुरक्षा विभागाने बारीक नजर ठेवली असल्याचे समजते.त्यात केलॉग्ज कॉर्नफ्लेक्स, हॉर्लिक्स, कॉम्लान, सफोला, राजधानी बेसन, ब्रिटानिया मारी लाईट अशा नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. फूड सिक्युरिटी अॅन्ड स्टँडर्डस अॅथॉरिटी ऑफ इंडियाने या सर्व कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या आहेत असे सांगण्यात येत आहे.

या कंपन्या  मुलांची उंची व बौद्धिक वाढ झपाट्याने होणे, वजन कमी करणे, हदयाला बळकटी आणणे, हाडे मजबूत होणे अशी विविध वैशिष्ठ्ये आपापल्या उत्पादनांत असल्याची जाहिरात सातत्याने करत आहेत. मात्र त्यासाठी कोणताही वैज्ञानिक ठोस पुरावा त्यांच्याकडे नाही. म्हणजेच एका परीने ही ग्राहकांची फसवणूकच आहे. पोषक मूल्ये असल्याचे कंपन्यांचे हे दावे कोणत्याही कसोटीवर उतरलेले नाहीत. त्यामुळे अशा जाहिराती करणे हे फूड सेफ्टी कायद्याच्या २४ व्या कलमाचे उल्लंघन आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा जारी केल्या आहेत.

या नोटीसा जारी करण्यापूर्वी त्रिसदस्यीय समिती या प्रकरणी नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या कंपन्या डबल स्टँडर्डसचा वापर करतात असेही तपासणीत दिसून आले आहे. उदाहरणार्थ हॉर्लिक्स कॉम्लान कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिरात यूके यूएस सारख्या देशांत करताना मुलांची उंची वाढ, बौद्धिक वाढ झपाट्याने होते असा दावा कधीच करत नाहीत पण इतकेच काय जाहिरातीसाठी तेथे लहान मुलांचाही उपयोग केला जात नाही. भारतात अन्न सुरक्षा कायद्यानुसार जाहिरातीतून ग्राहकांची दिशाभूल केली जात असेल तर १० लाख रूपये दंडाची तरतूदही आहे. मात्र या कंपन्या त्यांच्या विक्रीतून जितका पैसा मिळवितात त्यामानाने हा दंड कांहीच नाही असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment