शिवसेना उद्धव ठाकरे यांची

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडले आहेत आणि त्यांनी आता महाराष्ट्राचा छोटा दौरा सुरू केला आहे. जानेवारीत त्यांचा मोठा दौरा  होणार आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारस असले आणि त्यांचे पुत्र असले तरीही त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या स्वभावात, वागण्यात, बोलण्यात, धोरणात मोठा फरक आहे हे मागेच लक्षात आले होते. त्यामुळे  उद्धव ठाकरे यांना आता आपल्या पद्धतीने शिवसेनेला आकार द्यावा लागणार आहे. धोरणात अनेक बदल करावे लागणार आहेत. मराठी माणसाचा कैवार तर घ्यावाच लागेल आणि मराठी अस्मिता जागवावीच लागणार आहे पण बाळासाहेबांच्या काळातल्या आणि आजच्या काळातल्या वातावरणात फरक पडलेला आहे. मराठी माणसाची अस्मिता कायम टिकवताना त्याला असलेली परराज्यांतल्या लोकांच्या द्वेषाची झालर कमी करावी लागणार आहे.

भारतात कितीही राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी बोलल्या तरीही प्रादेशिक अस्मिता या असतातच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी.डी.देशमुख आणि यशवंतराव चव्हाण हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते होते पण त्यांच्याही मनात आपल्या मराठी पणाचा अभिमान होता. त्यांनी आपल्या या मराठीपणाच्या अभिमानापोटी अन्य प्रांतातल्या कोणाची कधी टिंगल टवाळी केली नाही. आपण मराठी आहोत याचा आपल्याला अभिमानच हवा पण शेवटी प्रत्येक भारतीय हा आपला भाऊच आहे हेही आपल्याला विसरता कामा नये. आपल्या वर्तनातून ते दिसले पाहिजे.

पंजाबात अकाली दल हा प्रादेशिक पक्षच आहे. तामिळनाडूतही दोन मुख्य पक्ष प्रादेशिकच आहेत पण त्यांच्या अस्मिता पोटी त्यांनी परराज्यातल्या कोणाही विषयी अनादर व्यक्त केलेला नाही. आता देशातले मनुष्यबळाचे स्थलांतर वाढले आहे आणि अनेक प्रांतातले लोक अनेक प्रांतात जात आहेत. तेव्हा या वातावरणात मराठीही जगली पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मताही साधली पाहिजे. हे शिवसेनेला करता येईल. गुजरातेत नरेन्द्र मोदी आणि प. बंगालमधील डावी आघाडी हे राष्ट्रीय पक्षाचेच एक भाग आहेत पण तेही आपल्या पक्षाची भूमिका पुढे रेटताना आपल्या प्रादेशिकतेचाही सूक्ष्म का होईना पण अभिमान जागाही ठेवतात आणि वाढवतातही. तसे शिवसेनेने करावे  कारण आता बदलत्या वातावरणात ते आवश्यक झाले आहे.

उद्धव ठाकरे यांचे स्वप्न महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणे हे असणारच. पण बाळासाहेबांच्या माघारी हे स्वप्न दुरापास्त वाटत आहे कारण मुळात बाळासाहेब हयात असतानाच ते अशक्य होऊन बसले होते. सत्तेने शिवसेनेला तीन वेळा हुलकावणी दिली होती. बाळासाहेबांच्या माघारी सत्ता मिळण्याची  शक्यता कमी होत आहे. शिवाय हे  स्वप्न पूर्ण होणे  एकट्या शिवसेनेवर अवलंबून नाही. त्यासाठी भाजपाचीही स्थिती चांगली हवी कारण भगवा फडकायचा असेल तर तो दोघांच्या युतीतूनच फडकरणार आहे. शिवसेनेच्या या भागिदाराचीही अवस्था वाईट आहे. अशा वेळी भगवा कसा फडकणार याचा विचार करायला हवा. काही प्रमाणात धोरणांत बदल करावा लागणार आहे. भाजपाच्या नेत्यांना काही सांगण्याची गरज नाही कारण त्यांचे धोरण ते ठरवत नाहीत. पण शिवसेनेपुरता आपण विचार करू शकतो.

शिवसेनेने ही गोष्ट आता मान्य केली पाहिजे की एखादा हिंदुत्वाचा भावनात्मक मुद्दा आणि मराठी अस्मिता यांच्याच जोरावर सत्ता मिळणे दुरापास्त आहे. पक्षाला मराठी अस्मिता तर राखलीच पाहिजे पण सोबत सामान्य माणसाचे  जगण्याचे  मुद्दे आणि विकासाचा अजेंडा समोर ठेवावा लागेल. बाळासाहेब याबाबत काहीच चिंतन करीत नसत. शिवसेनेचे नेते सहकाराच्या माध्यमातून किवा अन्य प्रकारांनी सामान्य माणसाच्या नित्य संपर्कात येत नाहीत तोपर्यंत  केवळ भाषणे आणि भावनात्मक मुद्दे यावर सत्ता मिळणार नाही. महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न बाळासाहेबांच्या भावनेचे मुद्दे उपस्थित करण्याच्या सवयीमुळे फोल ठरत आले आहे. 

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हे धोरण बदलले तरच भगवा फडकणे शक्य होणार आहे. आता शिवसेनेचे कर्ते धर्ते उद्धव ठाकरे हेच आहेत. यांनी आपण शिवसेना प्रमुख होणार नाही असे सांगितले आहे. त्यातून जे संकेत दिले आहेत त्यांचे अनेक अंगांनी विश्लेषण करता येईल. हे पद नाकारण्यातून ठाकरे यांचा नम्रपणा दिसून आला आहे पण, नम्रपणा हा नेहमीच योग्य असतो असे नाही. कमालीची व्यक्तिपूजा असणार्याा शिवसेनेत ते पद कोणीही स्वीकारणार नाही हे ठीकच आहे पण, ते नाकारण्यातून जो नम्रपणा दिसतो तो केवळ अनाग्रहीपणा नसून आत्मविश्वासाचा अभाव आहे असेही दाखवत असतो. तो तसा नाही हे दाखवून देणयाचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागणार आहे. त्यानी नम्रता म्हणजे आक्रमकपणाचा अभाव असेही मानले जाऊ शकते हा समज चुकीचा आहे असे त्यांना दाखवावे लागेल कारण आक्रमकपणा ही तर शिवसेनेची खासीयत आहे. आक्रमक तरीही समंजस अशा नेतृत्वाची अपेक्षा आहे.

Leave a Comment