मार्चपासून मोबाईल युजरना फ्री रोमिंग

नवी दिल्ली दि.६ – पुढील वर्षाच्या मार्चपासून भारतातील मोबाईल ग्राहकांना फ्री रोमिंग
ची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. टेलिकॉम विभागाने मोबाईल कंपन्यांना मार्च पासून फ्री रोमिंग देण्याचे आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारने फ्री रोमिंगची केलेली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी हे आदेश दिले गेले असले तरी पूर्वीपासून मोबाईल कंपन्यांनी फ्री रोमिंगला विरोध केला आहे. यामुळे कंपन्यांचा महसूल १० टक्कयांनी घटण्याची व हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांना दरवाढ करावी लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आता सरकारी आदेशच निघाल्याने मार्चपासून फ्री रोमिंग ग्राहकांना उपलब्ध होईल.

याचबरोबर मार्चपासूनच मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी योजनाही सुरळीत आणि सुलभ करण्याचे आदेशही मोबाईल कंपन्यांना दिले गेले आहेत.या योजनेनुसार सध्या ग्राहकाला ठराविक सर्कलमध्येच पोर्टेबिलीटी घेता येते. म्हणजे दिल्लीतील मोबाईल ग्राहक त्याच सर्कलमध्ये कार्यरत असणार्याल अन्य कंपन्यांचे कनेक्शन मूळचा नंबर न बदलता घेऊ शकतो. आता मात्र देशभरात कुठेही कोणत्याही सेवा पुरवठादाराचे कनेक्शन घेताना मूळचा मोबाईल नंबर कायम राहण्याची सुविधा ग्राहकाला मिळू शकणार आहे.

Leave a Comment