घटनेच्या शिल्पकारास मानवंदना

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरीनिर्वाण दिन आहे. भारताच्या कल्याणासाठी ज्या महापुरूषांनी आपले देह झिजवले त्या मोजक्याच महापुरूषांमध्ये डॉ.आंबेडकर यांचा समावेश होता. त्यांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या संबंधात आज समाजात पसरवले जाणारे गैरसमज कसे चुकीचे आहेत याचे प्रत्यंतर येते. डॉ.आंबेडकर हे दलितांचे नेते आहेत असे सरसकट म्हटले जाते. ते दलित कुटुंबात जन्माला आले होते हे खरे आणि ते नेते होते हेही खरे परंतु ते केवळ दलितांचे नेते नव्हते तर ते पूर्ण देशाचे नेते होते. भारताच्या सामाजिक जीवनास अस्पृश्यतेचा कलंक लागलेला होता. तो पुसून टाकण्यासाठी आणि पददलित समाजाला देशाच्या प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी मोठेच कार्य केले हे खरे परंतु त्यांनी तेवढेच कार्य केले असे काही नाही. देशाच्या हिताचे याशिवाय इतरही फार मोठे कार्य त्यांनी केलेले आहे.

मात्र त्यांना सातत्याने दलितांचे नेते म्हटले जात असल्यामुळे त्यांच्या या व्यापक कामाकडे दुर्लक्ष होते आणि त्यांच्यावर अन्याय होतो. भारतातल्या एका वृत्तवाहिनीने महात्मा गांधी नंतरचा देशातला महनीय महापुरूष कोण याबाबत लोकांची मते आजमाविली. अनेक पर्याय समोर ठेवलेले होते. नेहरू, पटेल, इंदिरा गांधी यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन इथपर्यंत अनेक नावांमधून गांधीनंतरचा महापुरूष शोधायचा होता. भारतीय लोकांनी या निवडीसाठी मतदान केले आणि महात्मा गांधी यांच्यानंतर गेल्या शतकभरामध्ये देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा, निर्णायक आणि दूरगामी पल्ल्याचा प्रभाव पाडणारे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली.

महात्मा गांधी आणि आंबेडकर या दोघांच्या बाबतीत एक मोठे साम्य आहे. या दोघांनीही देशाला वैचारिक दिशाही दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्या दिशेने लोकांनी चालावे यासाठी स्वतः त्या मार्गावरून मार्गक्रमण केलेले आहे आणि लोकांना त्यावरून चालायला लावले आहे. अशा प्रकारे विचार आणि कृती या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रभावी कार्य करून या दोघांनी देशातल्या मोठ्या जनसमुहाच्या वर्तनात आणि परिस्थितीत मोठा बदल घडवून आणला आहे. महात्मा गांधी यांना तर सारा देश महामानव मानतोच. परंतु त्यांच्या खालोखाल आजपर्यंत तरी आंबेडकरांना कोणी मानत नव्हते. परंतु आता मात्र ती मान्यता मिळायला लागली आहे. कारण त्यांनी आपल्या हयातीमध्ये देशाचे जे चित्र पाहिले होते ते त्या काळात कोणाला समजले नव्हते. आज मात्र ते चित्र तसे निर्माण व्हायला लागले आहे आणि त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय यायला लागला आहे.

Leave a Comment