इंदू मिलच्या जागेवर होणार डॉ. आंबेडकर स्मारक

मुंबई: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा प्रदान करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. या निर्णयाचे आंबेडकरी जनतेकडून आणि डॉ. आंबेडकरांच्या कर्तुत्वाबदल्ल अभिमान असणाऱ्या जनतेकडून स्वागत करण्यात आले. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी इंदू मिलच्या समोर मोठ्या प्रमाणात आतषबाजी आणि जल्लोष करण्यात आला.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सन १९९६ पासून इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेची मागणी केली जात आहे. ही जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी इंदू मिलची जागा स्मारकासाठी देण्याचा निर्णय लोकसभेत जाहीर केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल; असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. डॉ. आंबेडकर हे केवळ महाराष्ट्राचे आणि एखाद्या समाजाचे नेते नव्हते. ते संपूर्ण देशाचे नेते होते. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय भांडवल करून त्याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करून नयेत; असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

हा निर्णय जाहीर झाल्यानंतर इंदू मिलच्या बाहेर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांसह आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले अशा अनेक नेत्यांनी हजेरी लावली. या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला.

जागा मिळणे हा पहिला टप्पा यशस्वी झाला असून आता राज्यशासनाने ३ वर्षात आंतरराष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी; अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment