डचेस ऑफ केंब्रिज केट रूग्णालयात दाखल

लंडन दि. ४ – डचेस ऑफ केंब्रिज आणि युवराज्ञी केट मिडलटन हिला डोहाळ्यांचा त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून ती तेथे आणखी कांही दिवस उपचार घेईल असे समजते. केटला सध्या तिसरा महिना असून तिला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला शिरेतून द्रवपदार्थ दिले जात आहेत. केटला रूग्णालयात दाखल करावे लागल्याने प्रिन्स विल्यम्स आणि केट पालक बनणार असल्याचे वृत्त अधिकृतरित्याच जाहीर झाले आहे. सेंट्रल लंडन हॉस्पिटलमध्ये केटवर उपचार सुरू आहेत.

विल्सम्स आणि केट यांच्याकडे पाळणा हलणार असल्याचे उघड झाल्याने जगभरातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांचाही समावेश आहे.

केटला होणारे अपत्य हे ब्रिटीश राजगादीचे प्रिन्स चार्लस, प्रिन्स विल्यम्स नंतरचे वारस असेल. प्रिन्स हॅरी सध्या अफगाणिस्तानात युद्धावर गेलेला असून त्याला हे वृत्त ईमेलने कळविले गेले असल्याचे राजघराण्याचे कॉरस्पाँडंट पीटर हंट यांनी सांगितले. राणीलाही हे वृत्त कालच सांगितले गेले असून राजघराणे आणि मिडलटन घराण्याला या वृत्तामुळे खूपच आनंद झाल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.