
पुणे दि. ४ – महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ म्हणजे आपल्या एस.टीत सध्यातरी महिला चालक येण्याची शक्यता दुरावली असल्याचे समजते. एस.टीत सध्या अनेक पदांसाठी भरती सुरू असून त्यात चालक, वाहक, ज्युनिअर क्लार्क आणि सहाय्यकाची पदे भरली जाणार आहेत. चालकांच्या ८९४८, वाहकांच्या ६२४७, ज्युनिअर क्लार्कच्या १९३८ तर सहाय्यकाच्या २६५८ जागांसाठी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. या सर्व जागांसाठी एसटीने प्रथमच महिलांना ३० टक्के आरक्षण जाहीर केले होते. मात्र चालक सोडून अन्य जागांसाठी महिलांचे अर्ज आले. पुणे विभागात आरक्षणानुसार महिलांसाठी ८६ चालकपदाच्या जागा होत्या मात्र एकही महिला शॉर्टलिस्ट होऊ शकली नाही असे समजते. पुणे विभागात चालक पदासाठी एकूण ३५६ जागा भरायच्या आहेत आणि त्याला पुरूष वर्गाकडून चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
