वैशिष्ठपूर्ण रिंगटोनसाठी ऑर्केस्ट्राची मदत

मोबाईल फोन क्षेत्रात क्रांती घडविणार्याक आणि दर्जेदार उत्पादनांसाठी विशेष ओळख असलेल्या नोकिया कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनसाठी वैशिष्ठपूर्ण रिंगटोन उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. यासाठी ५५ जणांचा समावेश असलेल्या ऑर्केस्ट्राशी त्यांनी करारही केला आहे. ब्रास्टीलाव्हा सिफनी ऑर्केस्ट्राने नोकियासाठी २५ मूळ शास्त्रीय संगीताच्या ट्यून्स रिंगटोन म्हणून तयार केल्या असून त्यातील कांही नोकियाच्या ल्यूमिया ९२० आणि ल्यूमिया ८२० या नव्या स्मार्टफोनवरही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नोकिया नजीकच्या भविष्यात स्मार्टफोनची नवीन श्रेणी बाजारात आणत आहे.

या रिंगटोन बनविण्यापूर्वी कंपनीच्या तज्ञांनी विशेष सर्वेक्षण आणि संशोधन केले असता शास्त्रीय संगीतावरचे रिंगटोन अतिशय लोकप्रिय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच निवडलेल्या शास्त्रीय धून असलेल्या रिंगटोन ऑर्केस्ट्राकडून वाजवून घेण्यात आल्या असे समजते. इबेन साऊंड कंपनीने त्यासाठी मदतीचा हात दिला. एपिक साऊंड ने रिंगटोन कंपोझ करायला हातभार लावला.

या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अँडरसन म्हणाले की वास्तविक मोबाईलचे रिंगटोन स्टुडिओतच सिंथेसायझरवर तयार केले जातात. मात्र नोकियाला युनिक रिंगटोन हवे होते. नोकियाचे रिंगटोन दिवसात किमान १ अब्ज वेळा ऐकले जातात त्यामुळे युजरला कंटाळा येऊ नये यासाठी वेगळे रिंगटोन तयार करण्याचे ठरविले गेले व त्यासाठी खास ऑर्केस्ट्रा करारबद्ध करण्यात आला. हे रिंगटोन अतिशय वेगळे आणि ऐकायला फारच चांगले आहेत याचा अनुभव आता ग्राहक घेतील.