उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्वेसर्वा

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कोणाचीच नियुक्ती केली जाणार नाही; मात्र शिवसेनाप्रमुखांचे सर्वाधिकार यापुढे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील; असे आज स्पष्ट करण्यात आले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दि. ३० रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वांद्रे सी लिंकच्या दुसऱ्या टोकाची जागा सुचविण्यात आली असून शिवाजी पार्क येथील जागा कायद्याच्या अडचणींमुळे देण्यात येणे शक्य नसल्याने शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभारण्यात आलेला चौथरा सामोपचाराने काढला जावा; असे प्रयत्न सरकारच्या वतीने सुरू आहेत.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क ऐवजी इतरत्र ५ एकर जागेचा शोध सुरू असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केल्याने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवरून संघर्ष न होण्याची शक्यता वाढली आहे. वास्तविक शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद निरर्थक असल्याचे शिवसेनेचे सध्याचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नाशिक येथील श्रद्धांजली सभेत बाळासाहेब यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच होईल; अशी डरकाळी फोडून वादाला तोंड फोडले. राऊत यांनीही शिवसेनाप्रमुखांचे अंत्यसंस्कार झालेली जागा ही शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असल्याचे सांगून स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे असे सूचित केले होते. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कायद्याला न जुमानता शिवाजी पार्कवर स्मारक करता येणार नाही; अशी स्पष्टोक्ती केली होती.

Leave a Comment