ठिबक सिंचन हाच उपाय

thibak2

मराठवाड्यातल्या शेतीची अवस्था वाईट झाली आहे. खरे तर आता शेतात रब्बी पिके डोलत असायला हवी आहेत पण या दिवसातच मे महिन्यात जाणवावी इतकी दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. पाणी नाही, हिरवळ नाही. पाटबंधारे प्रकल्पात पाणी नाही. आहे ते पाणी आधी प्यायला आणि नंतर शेतीला. मुळात पिण्या एवढेही पाणी नाही तर शेतीला मिळणार कोठून ? अशी अवस्था वारंवार दिसायला लागली तर शेती व्यवसाय , त्यातले भरपूर पाणी पिणारे उसाचे पीक आणि पाण्याचे नियोजन याबाबतीत काही तरी क्रांतिकारक नवा कार्यक्रम किवा नवे तंत्रज्ञान अंमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठवड्यातले शेतीचे चित्र १९७२ पेक्षाही  भीषण आहे.  काय करावे ते समजत नाही. मजूर वर्ग शहरांत जात आहे. कारण तिथे त्यांना हक्काचा रोजगार मिळत आहे.  पण ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांची गावात पोट भरत नाही आणि शहरात जाता येत नाही अशी अवस्था झाली आहे.

मजूर वर्ग मोठ्या संख्येने शहरात गेल्यामुळे आहे त्या शेतीसमोरही मजुरांच्या टंचाईचा प्रश्न उभा राहिला आहे. शहरात राहणार्या  लोकाना  खेड्यातल्या या वातावरणाची जाणीवही होत नाही आणि कल्पनाही येत नाही.  पाण्याच्या टंचाईने खेड्यांवर फार मोठे ऐतिहासिक संकट ओढवले आहे. एखादे नवे तंत्रज्ञान निर्माण झाले तरी शेतकरी त्या बाबतीत नेहमीच मागे असतो. आपल्या शेतीच्या दैन्यामागे नेमके कारण काय? याचा शोध घेऊन त्या कारणावर घणाघात केला पाहिजे याची जाणीव या शेतकर्यांशना म्हणाव्या तेवढ्या तीव्रतेने होत नाहीच पण तसे मार्गदर्शन करणारेही आता दिङमूढ झाले आहेत. 

मात्र शेतकरी त्यांना उपलब्ध होत असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करीत नाहीत. या बाबतीतली  सगळ्यात मोठी तांत्रिक चूक म्हणजे मोकाट पद्धतीने शेताला पाणी देणे. पाणी हे किती अनमोल आहे यावर विविध दैनिकांतून आणि नियतकालिकांतून सातत्याने लेख छापून येत आहेत आणि पाण्याची अशी उधळमाधळ सुरू राहिली तर येत्या १०-२० वर्षात पाण्याची उपलब्धता अगदीच कमी होऊन जाईल आणि शेतकर्यांधपुढे अनवस्था प्रसंग उभे राहील, असे इशारे अनेक लोक देत आहेत. परंतु शेतकर्यां मध्ये असा एक मोठा वर्ग आहे की, ज्याने हा इशारा मनावर घेतलेलाच नाही. त्यामुळे जेवढ्या पाण्यात एखादे पीक येऊ शकते त्याच्या साधारण पाच ते सहा पट पाणी तो सध्या वापरत आहे.

ही केवळ पाण्याचीच उधळपट्टी आहे असे नाही तर त्यामुळे पीकही चांगले येत नाही, उत्पादन खर्च वाढतो, मशागतीचा खर्च वाढतो, जमीन खराब होते असे इतरही तोटे आहेत. त्यामुळे आता देशभरात तातडीने ही पाणी देण्याची मोकाट पद्धत बंद केली पाहिजे आणि कमीत कमी पाण्यात चांगले पीक आणणारी ठिबक सिंचनासारखी तंत्रज्ञाने विकसित करून वापरली पाहिजेत. काल शरद पवार यांनी पुण्यात बोलताना याच वर्मावर बोट ठेवले. पाण्याच्या वापराचे नियोजन केल्याशिवाय शेती जगणार नाही असे ते म्हणाले. पाटबंधारे योजनांतले पाणी शेतकर्यांासाठी असते असा समज करून बसलात तरी शेतीला यापुढे पाणी मिळणे दुरापास्त आहे. पाणी वापराचे तंत्रज्ञान नीट वापरले तर मात्र  आपल्या देशामध्ये शेती व्यवसायात प्रचंड मोठी क्रांती होईल. त्याशिवाय पाण्याची फार मोठी बचत होऊन शहरांचे आणि उद्योगांचे पाण्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.

सध्या पाणी हा सर्वांच्या चिंतेचा विषय झाला आहे. कारण पाण्याची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त झाली आहे. त्यातच आपण जमिनीतले पाणी अगदी खोलात जाऊन उपसायला लागलो आहोत. त्यामुळे पाण्यापायी सर्वांनाच विस्थापित होण्याची वेळ येते की काय, अशी शंका वाटायला लागली आहे. परंतु आपण पाण्याचे ऑडिट केले आणि पाण्याच्या वापराचे आकडे सरळपणे समोर ठेवले तर असे लक्षात येते की, पाण्याची समस्या दाखवली जाते तेवढी गंभीर नाही. कारण आपल्याला उपलब्ध होणार्याा पाण्यापैकी ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जात असते. त्यातल्या त्यात उसाला फारच पाणी लागते. म्हणून काही कृषी तंत्रज्ञांनी असा दावा केला आहे की, महाराष्ट्रातली एक लाख हेक्टर क्षेत्रातली ऊस शेती बंद केली तर राज्यातल्या सगळ्या शहरांना दिवसातून दोन वेळा मुबलक पाणी पुरवता येईल.

राज्यामध्ये जवळपास ४० लाख हेक्टर जमिनीवर ऊस लावला जातो. त्यासाठी होणारा पाण्याचा वापर विचारात घेतला तर उपलब्ध पाण्याचा किती मोठा हिस्सा उसासाठी वापरला जात असतो याची कल्पना येईल. अर्थात त्यासाठी खरोखर ऊस शेती बंद करण्याची काही गरज नाही. ठिबक सिंचन हा त्यावरचा उपाय आहे. आपल्या देशातल्या शेतकर्यां्च्या मनामध्ये पाणी आणि शेती यांच्याविषयी काही विक्षिप्त कल्पना निर्माण झालेल्या आहेत. शेताला जेवढे जास्त पाणी दिले जाईल तेवढे चांगले पीक येईल, अशी कल्पना शेतकर्यां च्या मनात खोलवर होत गेली आहे. पिकाला भरपूर पाणी लागत नसते तर नेमके आणि माफक पाणी वेळेवर लागत असते.  ही गोष्ट त्याला आधी कळली पाहिजे.

Leave a Comment