निवृत्तीसाठी सचिनवर दबाव नको

ऑस्ट्रेलिया संघाचा कणा असलेल्या रिकी पाँटिंगने काही दिवसापुर्वीच निवृत्तीची घोषणा केली. आता त्यामुळे प्रत्येकाच्या नजरा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट भविष्याकडे लागून राहिल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून फॉर्म हरवलेला तेंडुलकरसुद्धा पाँटिंगच्या मार्गावर चालून तसाच निर्णय घेतो काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या निवृतीवरून क्रिकेटवेड्या भारतात उभी फुट पडली आहे. सचिनने निवृत्ती पत्करावी असा म्हणणारा एक गट आहे तर त्याच्या निवृत्तीचा निर्णय त्यानेच घ्यावा असा म्हणणारा दुसरा गट आहे. त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्याच्या निवृत्तीचा निर्णय त्यालाच घेण्याचे स्वातंत्र्य दयावे असे वाटते. त्याच्यावर निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी कोणीही दबाव टाकू नये.

संघासाठी ४० वर्षापर्यंत कामगिरी करताना खेळाडूसाठी निवृत्तीचा निर्णय घेणे किचकट असतो. कोणता खेळाडू केव्हा निवृत्ती घेईन, हे सांगणे कठीण असते. वाढते वय सर्वाधिक प्रभावी कारण मानले जाते. वय वाढत असताना खेळाडू कामगिरीत कमी पडतात, ही सामान्य गोष्ट आहे. फुटवर्कही काम होतो तर स्ट्रोक्समधील ताकदही कमी होत जाते. हे सर्व खरे असले तरीही निवृत्तीचे वय नेमके कोणते असावे, हे कोणीही ठामपणे सध्या तरी सांगू शकत नाही.

संघासाठी हवे ते योगदान देण्यात अपयशी ठरत असल्याने निवृत्त होत असल्याचे रिकी पाँटिंगचे म्हणणे आहे. याविरुद्ध आपण लवरकच फॉर्मात येऊ, असे सचिन तेंडुलकरला वाटते. पाँटिंगचे वय ३८ आणि सचिन आता ४० वर्षांचा होणार आहे. सचिनपेक्षा वयाने दोन वर्ष लहान असतानासुद्धा पाँटिंग खेळातून माघार घेत आहे. मात्र, सचिन टिकून आहे. प्रत्येक खेळाडूसाठी आत्मविश्वास, आत्मबळ ही सर्वांत मोठी शक्ती असते, हे साधे गणित आहे. सचिनमध्ये आत्मबळ आहे म्हणून तो टिकलेला आहे. यात हरकत घेण्यासारखे काय आहे. केवळ कामगिरी चांगली होत नाही म्हणून त्याच्यावर निवृतीसाठी दबाव टाकणे चुकीचा आहे असे वाटते.

सचिन शिवायही त्याच्या वयाची आणखीन काही खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल ३९ वर्षांचा आहे. या वयातसुद्धा तो द्विशतक ठोकत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसही ३७ व्या वर्षी शतके ठोकत आहे. विंडीजच्या ख्रिस गेलने ३५ वय ओलांडले आहे. ऑस्ट्रेलियाच्या माइक हसीचे वय ३६ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकतीच त्याने दोन शतके ठोकली. श्रीलंकेचे तीन दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान यांचे वय सुद्धा ३५ वर्षापेक्षा अधिक आहे. हे तिघेही सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. असे असताना टीकाकार मंडळी मात्र केवळ सचिनलाच लक्ष करीत आहेत.

महान क्रिकेटपटू जॅक होब्स हा वयाच्या ४७ वर्षांपर्यंत तर सर डॉन ब्रॅडमन आणि क्लाइव्ह लॉयड ४० तर इम्रान खान ३९ वर्षांपर्यंत खेळत होते. या खेळाडूंच्या उदाहरणावरून स्पष्ट होते की, खेळाडूसाठी खेळत राहणे हे त्याचा फॉर्म, फिटनेस आणि खेळात टिकून राहण्याच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. रिकी पाँटिंगने आपण शंभर टक्के योगदान देत नसल्याचे कारण सांगत त्याने माघार घेतली.

सचिनला मात्र अजून देशासाठी काही तरी करायचे असले हे देखील विसरून चालणार नाही. एकदिवस त्याला निवृत्त व्हयाचे आहेच. त्याच्या गैरहजेरीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून वीरेंद्र सेहवाग, गोतम गंभीर, झहीर कहाण व हरभजन सिंग यांची कामगिरी चांगली होत नाही. त्यामुळे त्याने ही निवृत्ती पत्करावी का असा सवाल यामुळे उपस्थित होतो. त्यामुळे त्याच्या निवृतीबाबत फार काही बोलत बसण्यापेक्षा निवृत्तीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सचिनला दयावे, त्याच्यावर निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी कोणीही दबाव टाकू नये असे वाटते.

Leave a Comment