भुजबळांच्या २१ कोटीचे २१०० कोटी झाले कसे: सोमैय्या

मुंबई: महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत केवळ तीन वर्षात २१ कोटी रुपयांवरून २१०० कोटी रुपये वाढ कशी झाली याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांनी उत्तर द्यावे आणि या वाढीची चौकशी करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी; अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केली.

तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भुजबळ स्वत:, त्यांचा मुलगा समीर आणि पुतण्या पंकज निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिघांनी निवडणूक आयोगाकडे जाहीर केल्याप्रमाणे तिघांकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे मिळून २१ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती दिली असून त्यानंतर तीन वर्षात त्यांचे विविध कंपन्यांमध्ये शेअर्स; त्यांच्या स्वत:च्या कंपन्या आणि शेत जमिनी; स्थावर मालमत्ता याच्या माहितीनुसार भुजबळ कुटुंबियांच्या संपत्तीत अविश्वसनीय वाढ होऊन ती आता २१०० कोटी रुपयांची झाल्याचा दावा सोमैय्या यांनी केला.

भुजबळ यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र भवनाच्या उभारणीत १० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यापूर्वी सोमैय्या यांनी केला होता. या प्रकरणाची लाचलुचपत विभागाने चौकशी करण्याची मागणी सोमैय्या यांनी केली होती.

Leave a Comment