भाजपाला हे कसे चालते?

भारतीय जनता पार्टीने गुजरात विधान सभेच्या निवडणुकांत आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एक अपेक्षित नाव आले आहे. ते आहे माजी गृहमंत्री अमित शहा यांचे. ते नाव येणार असे सर्वांना वाटत होते पण तरीही ते न येण्याचीही एक शक्यता वाटत होती. कारण अमित शहा यांच्यावर खुनाचा आरोप आहे. त्यांना तिकीट देणे भाजपासाठी गरजेचे आहे पण तरीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या धावपट्टीवरून तिथले मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचे विमान टेक ऑफ घेणार आहे म्हणून काही नैतिकतेचा आदर्श घालून देण्यासाठी भाजपा नेते अमित शहा यांना तिकीट देणे टाळतील अशीही एक आशा वाटत होती. मात्र साधन शुचिता पाळून राजकारण करण्याचा दावा करणार्या  भारतीय जनता पार्टीने या आरोपी मंत्र्याला तिकीट तर दिलेच आहे पण आपणही अन्य पक्षांप्रमाणे नैतिकते पेक्षा निवडून येण्याला आणि जातीय विभाजनाला अधिक महत्त्व देत असतो हे दाखवून दिले आहे.

भाजपा हा पक्ष म्हणजे पार्टी वुईथ डिफरन्स. म्हणजे इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याची टिमकी पक्षाचे नेते वाजवत असतात. भाजपा सोडता सगळ्या पक्षांमध्ये गुन्हेगारांना तिकिटे दिली जातात. अन्य पक्षांमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांची भरती असते असे एक ना अनेक उदाहरणानिशी भाजपाचे नेते आपल्या सोवळ्याची जाहिरात करत असतात. परंतु भाजपाचे हे सोवळे अनेक राज्यात फिटलेले आहे. दोन बनावट चकमकीच्या प्रकरणात आरोपी असलेले गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांना ते आरोपी असतानाही विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

अमित शहा हे सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती या दोघांच्या बनावट चकमक प्रकरणामध्ये आरोपी आहेत. या चकमकी घडविणाऱ्या पोलिसांनी चकमक असल्याचा भास निर्माण करून या दोन लोकांना जवळून गोळ्या घालून ठार केले. अशा या दोघांच्या हत्या होत असताना गृहमंत्री असलेले अमित शहा हे गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी फोनवरून कायम संपर्क साधून होते, असे या प्रकरणाच्या सुनावणीत उघड झाले आहे.

यामुळे अमित शहा यांना अटकही झाली होती आणि त्यांना अनेक दिवस कारागृहात काढावे लागलेले आहेत. बऱ्याच दिवसांच्या न्यायालयीन लढाईनंतर त्यांना अखेर जामीन मिळाला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बरेच दिवस गुजरातमध्ये प्रवेश करायला बंदी घातली होती. अलीकडे त्यांच्यावरची ही बंदी उठली म्हणून ते गुजरातेत येऊ तरी शकले. मात्र गेल्या सप्टेंबरमध्ये गुजरात मध्ये प्रवेश केल्यापासून बरेच शांत झाले होते. कारण त्यांच्या विरोधात मनुष्यहत्येचा मोठाच गुन्हा आहे आणि हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

परंतु अशाही परिस्थितीत त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आलेले आहे. कारण अमित शहा हे मुख्य मंत्री नरेंद्र मोदी यांचे अतिशय निकटचे सहकारी मानले जातात आणि म्हणूनच ते मोदी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते यापूर्वी अहमदाबाद शहराच्या सरखेज मतदारसंघातून अडीच लाख मतांच्या आधिक्याने निवडून आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी त्या गुन्ह्यांमुळे ते मुस्लिमांचे कट्टर वैरी ठरले आहेत.       

आपली प्रतिमा ते तशी  निर्माण करतात आणि त्यामुळे मतदारांचे जातीय ध्रुवीकरण होते आणि त्यांना एवढे प्रचंड मताधिक्य मिळू शकते आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला त्यांना तिकीट देणे भाग असते. पक्षाची हिंदुत्ववादी आणि मुस्लीमविरोधी प्रतिमा अधिक गडद करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अशा लोकांचा वापर करत असते. एवढेच नव्हे तर खुद्द नरेंद्र मोदी यांचे एलिस ब्रीज या मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणे हे अमित शहा यांच्यावर अवलंबून असते. म्हणूनही अमित शहा यांना तिकीट देणे ही केवळ भारतीय जनता पार्टीचीच नव्हे तर नरेंद्र मोदी यांची सुद्धा मजबुरी असते.

अमित शहाला तिकीट दिल्याने केवळ त्यांच्या मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण गुजरातमध्येच जातीय ध्रुवीकरण होत असते, जे भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडते आणि म्हणूनच सारी साधन शुचिता गुंडाळून एका तोंडाने तत्वाच्या गोष्टी बोलत भाजपाचे नेते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना प्राधान्याने तिकीटे देत असतात. इतर पक्षांनी असे केल्यास मात्र भाजपाचे नेते त्यांना शिव्यांची लाखोली वाहतात.

Leave a Comment