कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा सोपा उपाय

आज जगभर हवामान बदलासंबंधी संशोधन सुरू आहे आणि हरीत गृहातून निर्माण होणारा व पृथ्वीचे तापमान वाढविण्यास कारणीभूत ठरणारा कार्बन वायू नियंत्रणात कसा आणायचा यावरील संशोधनासाठी अब्जावधी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र एकूणच ब्लॅक कार्बनचे प्रमाण कमी करायचे असेल तर अत्यंत सोपा उपाय संशोधकांना सापडला आहे. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांत, जेथे वीज नाही तेथे प्रकाश मिळविण्यासठी वापरले जात असलेले रॉकेलवरचे कंदील, चिमण्या यांचा वापर बंद करणे हा तो उपाय आहे.

यूएस बर्कले आणि इलिनॉई विद्यापीठातील संशोधकांनी या संदर्भात जी निरीक्षणे नोंदविली आहेत त्यानुसार केरोसीनचा वापर आज देशभरातील २५० ते ३०० अब्ज घरांतून प्रकाश मिळविण्यासाठी केला जातो. हा कार्बन केरोसीनचे ज्वलन पूर्णतेने न झाल्याने तयार होतो आणि तो थेट हवेत मिसळतो. लाकूड जाळल्यावर निर्माण होणारा ब्लॅक कार्बन हा १ टक्का असतो तर केरोसीन ज्वलनातून निर्माण होणारा अब्जावधी घरातला हा कार्बन प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो. या ज्वलनातून बाय प्रॉडक्ट म्हणून निर्माण होणारा ब्लॅक कार्बन समजा १ किलो असेल तर तो १०० वर्षात ७०० किलो कार्बन डाय ऑक्साईड जेवढे तापमान वाढवेल तेवढे महिन्याभरात वाढवितो असे संशोधक  ब्लॅक टॉमी यांचे म्हणणे आहे. केरोसीनच्या ज्वलनातून निर्माण हेाणारा हा कार्बन थेट हवेत मिसळतो आणि हवामान बदलाचे फटके सोसावे लागतात असेही त्यांचे म्हणणे आहे.

स्मिथ आणि अन्य कांही संशोधकांनी नेपाळमध्ये संसर्गजन्य रोगांबाबत जे संशोधन केले होते त्यातही असे आढळले की ज्या घरात प्रकाश मिळविण्यासाठी केरोसीन वापरले जाते त्या घरातील महिलामध्ये क्षय रोगाचे प्रमाण अन्य महिलाच्या तुलनेत १० पट अधिक होते. म्हणजेच केरोसीनमधून बाहेर पडणारा ब्लॅक कार्बन केवळ हवेचे तापमनानच वाढवत नाही तर तो क्षयासारख्या रोगांनाही आमंत्रण देतो.