पालघरच्या युवतींनी गाव सोडले

पालघर: फेसबुक पोस्ट प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर या प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी ते अधिकच चिघळत चालले आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन्ही युवतींनी पालघर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी मात्र या युवतींवरील आरोप मागे घेण्याची तयारी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदच्या विरोधात पालघर येथील शाहीन डाढा या युवतीने फेसबुकवर मजकूर पोस्ट केला होता. रेणू या युवतीने तो मजकूर ‘लाईक’ केला. शाहीन याने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला; तर रेणू केरळ गाठणार आहे.

सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडविण्याच्या आरोपावरून पालघर पोलिसांनी या दोघींना अटक केली होती. या कारवाईबद्दल मोठ्या प्रमाणात टीका झाली. गृह विभागाने या कारवाईची कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांच्यामार्फत चौकशीही केली.या अहवालानुसार या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल ठाण्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आले. हा खटला चालविणारे पालघरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र बागडे यांची उच्च न्यायालयाकडून त्वरित जळगाव येथे बदली करण्यात आली.

दरम्यान; पालघर येथीलच एका युवकाने फेसबुकवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याबद्दल त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आल्याने त्याला मुक्त करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment