विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे फुफ्फुसांच्या विकाराने ग्रस्त असून आणखी काही काळ त्याला ब्रिटनमध्ये इक्वेडोरच्या दूतावासात असाच काढावा लागला तर त्याच्या तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो असे इक्वेडोर येथील वार्षिक संमेलनात राजदूत अन अल्बन यांनी जाहीर केले. या संमेलनाला इक्वेडोरचे अध्यक्ष राफेल कोरिया हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना अल्बेन म्हणाल्या की असांजे गेले काही दिवस आजारी आहे. त्याला फुफ्फुसांचा विकार असून त्याचा वैद्यकीय खर्च इक्वेडोर सरकार करत आहे आणि त्याची ब्रिटन दूतावासात नियमित वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. मात्र तो ज्या परिस्थितीत राहतो आहे त्यामुळे त्याची तब्येत कधीही अधिक बिघडू शकते.
अमेरिकन संरक्षण विभागाच्या इराक आणि अफगाणिस्तान युद्धाबाबतची अनेक गुप्त कागदपत्रे तसेच अमेरिकन मंत्र्यांच्या महत्त्वाच्या गुप्त केबल्स जाहीर केल्यामुळे असांजेने अमेरिकेचा रोष ओढवून घेतला आहे. त्यातच त्याच्यावर लैगिक अत्याचार आणि बलात्काराचा आरोप स्वीडन सरकारने लावला असून त्याचे हस्तांतरण करावे अशी विनंती ब्रिटन सरकारला केली आहे आणि ती मान्य करण्यात आली आहे. मात्र तेव्हापासून म्हणजे १६ ऑगस्टपासून असांजेने लंडन येथील इक्वेडोर दूतावासात आश्रय घेतला आहे. इक्वेडोर सरकारने त्याला राजकीय आश्रय दिला आहे मात्र ब्रिटन सरकारने त्याला लंडनमधून बाहेर पडण्यास सेफ पॅसेज दिलेला नसल्याचे तो अडकून पडला आहे.