मुंबई गिरणी कामगारांचे पुण्यात पुनर्वसन ?

पुणे दि. २८ – पुण्याजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे चर्चेत आलेल्या चाकण तसेच औद्योगिक वसाहतीमुळे विकसित झालेल्या तळेगांव दाभाडे आणि अन्य कांही तालुक्यात मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ५३ एकर जागा निश्चित करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या जागेत ६ हजार कामगारांसाठी घरकुले उभारली जाणार असून पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी या संबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाला नुकताच सादर केला असल्याचे समजते. या प्रस्तावानुसार जागा पाहणी करण्यासाठी मंत्रालयातील अधिकार्यांसचे एक पथक डिसेंबरमध्ये पुण्यात येणार असून त्यांच्या शिफारशीनंतर या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

मुंबई गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. सर्व गिरणीकामगारांना मुंबईतच घरे देणे जागेअभावी अशक्य ठरते आहे. राज्य शासनाने या प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हाडा लॉटरीतून घरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र दीड लाख कामगारांना घरे द्यायची असून या लॉटरीतून ४८ हजार कामगारांनाच घरे मिळणार आहेत. त्यामुळे मुंबईपासून जवळ असलेल्या पुण्याचा विचार सुरू करण्यात आला आणि पुण्याजवळच वेगाने विकसित होत असलेल्या तळेगांव दाभाडे, चाकण, नांदे, पिपळे, सांडभोरवाडी या भागातील ५३ एकर जागा हेरण्यात आली आहे असे समजते.

Leave a Comment