बाळासाहेबांची रक्षा असल्याचे सांगून लाटला रेल्वेचा पाहुणचार

मुंबई दि. २८ – कुर्ला येथून सीएसटी वाराणसी या खचाखच भरलेल्या रेल्वेत पूर्ण बुकींग असलेल्या डब्यात चढून वाराणसीचा प्रवास आरक्षणाशिवायही आरामात आणि रेल्वे खानपान सेवेचा मोफत लाभ घेत कुर्ला येथील दोन तरूणांनी केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेली शक्कल मात्र वाराणसी स्टेशनवर त्यांना लाथाबुक्कया खाण्यास कारणीभूत ठरली.

त्याचे असे झाले की सेनाप्रमुख बाळासाहेबांचे १७ नोव्हेंबरला निधन झाल्यानंतर २२ नोव्हेंबरला सीएसटी वाराणसी गाडीत दोन तरूण चढले. त्यांनी दुसर्यानच प्रवाशाचे बुकींग असलेल्या बर्थवर मातीचे लाल फडक्यात झाकलेले दोन कलश ठेवले होते. संबंधित जागेवर बसण्यासाठी आरक्षण केलले प्रवासी आले तेव्हा त्यांनी या कलशात बाळासाहेबांची रक्षा असून ती गंगेत विसर्जन करण्यासाठी काशीला नेत असल्याचे सांगितले. शिवाय मडकी जमिनीवर ठेवता येणार नाहीत असेही सांगितल्याने संबंधित प्रवाशांनी आपल्या जागा या दोघांना त्वरीत दिल्या. संपूर्ण प्रवासभर या दोघांनी रेल्वेतील खाद्यपेयांचा समाचार घेतला तोही मोफत.कारण तेच.

मात्र वाराणसी स्टेशनवर येताच हे दोघे कलश तेथेच विसरून चालल्याचे पाहताच अन्य सहप्रवाशांनी त्यांना आठवण करून दिली तेव्हा देाघांनीही हसून कलशात कांहीच नसल्याचे व त्यांना कनफर्म तिकीट न मिळाल्याने ही युक्ती योजल्याचे सांगितले. तेव्हा मात्र या सहप्रवाशांचा पारा चढला आणि सर्वच प्रवाशांनी या दोघांची यथेच्छ पाद्यपूजा केली. शिवाय असली चेष्टा पुन्हा करणार नाही असेही त्यांच्याकडून वदवून घेतले व मगच त्यांची सुटका झाली. अशोक सिंग आणि सचिन वर्मा अशी या दोघांची नांवे असून छटपूजेसाठी त्यांना काशीला जायचे होते मात्र गाडी फुल्ल असल्याने त्यांना आरक्षण मिळाले नव्हते असे समजते.

Leave a Comment