देशात पुन्हा आणीबाणी अवतरली: झी समूहाचा आरोप

नवी दिल्ली: काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सत्य दडपण्यासाठी पत्रकारांची मुस्कटदाबी करीत असून भारतात पुन्हा आणीबाणी अवतरली आहे; अशा शब्दात झी वृत्तवाहिनीने सरकारवर टीका केली.

कोळसाकांडातील जिंदाल उद्योगसमूहाच्या सहभागाची वृत्त प्रसिद्ध करून १०० कोटी रुपयांची जाहिरात मागितल्याप्रकरणी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि व्यवसाय प्रमुख समीर अहलुवालिया यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून झी समूहाचे प्रमुख सुभाष चंद्र यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नोटीस जारी केली आहे.

या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सरकारवर गळचेपीचा आरोप केला आहे. कोळसाकांडावरून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी झीच्या पत्रकाराना अटक करून अकारण सनसनाटी निर्माण केली जात आहे; असा वाहिनीचा आरोप आहे. यापूर्वी झी न्यूज आणि अन्य वृत्तवाहिन्यांनी काँग्रेस खासदार आणि स्टील उद्योजक नवीन जिंदाल यांच्याबाबत २६८ वृत्त प्रसिद्ध केली आहेत. कोळसाकांड प्रकरणाला वाचा फोडणारे वार्तांकन आम्ही केले. त्यामुळेच आमच्या सवालांना उत्तरे देण्याऐवजी जिंदाल यांच्या दबावाखाली पोलिसांना आमच्याविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे; असा आरोप झी न्यूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक आगरवाल यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Leave a Comment