‘त्या’ क्‍युरेटरची हाकलपट्टी

मुंबईच्‍या पिचवर धोनीच्‍या फिरकीपटूंना कमाल दाखवता आली नसल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे. त्याच पिचवर मात्र, इं‍ग्‍लंड संघाच्‍या मॉंटी पानेसरने टीम इंडियाचे पानिपत केले होते. पानेसर आणि ग्रॅम स्‍वान यांनी एकूण १९ विकेट घेतल्‍या होत्‍या. पानेसरने ११ तर स्‍वानने ८ विकेट मिळवल्‍या होत्‍या. मात्र त्याच पिचवर टीम इंडियाच्या फिरकीपटूंना काहीच चमत्कार करता आला नाही. त्यामुळे कर्णधार धोनी सध्या पिच तयार करणा-या क्‍युरेटरवर नाराज आहे. त्यातच ईडन गार्डनचे पिच क्‍युरेटर प्रबीर मुखर्जी यांने कर्णधार धोनीचा सल्ला न ऐकल्याने पदावरून हटवण्‍यात आले आहे.

मुंबईमधील दुसरा कसोटी सामना हरल्याने ईडन गार्डनची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी करण्‍यात यावी, अशी मागणी धोनीने केली होती. मात्र त्याच्या या मागणीकडे प्रबीर यांनी साफ दुर्लक्ष केले होते. प्रबीर मुखर्जी यांच्‍याऐवजी आता त्रिपुराचे आशिष भौमिक यांना पिच क्‍युरेटर बनवण्‍यात आले आहे. या ठिकाणी ५ डिसेंबरपासून तिस-या कसोटीस सुरूवात होणार आहे. सध्या भारत-इंग्लंड संघाने एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार धोनीने मुंबई कसोटीसाठीही फिरकीला साथ देणा-या पिचची मागणी केली होती. आणि त्‍याला त्‍याचप्रमाणे खेळपट्टी मिळाली होती. मात्र, त्‍याचा हा डाव टीम इंडियावरच उलटला होता. मुंबई कसोटीत टीम इंडियाला दहा विकेट्सनी पराभव स्‍वीकारावा लागला होता. हा पराभव टीम इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच आता टीम इंडियाकडून आगमी काळात चूक होऊ नये म्हणून ताकही फुंकून पिले जात आहे.

Leave a Comment