आम आदमी पार्टीची नोंदणी २ डिसेंबरपासून

रोहा दि.२८ – रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २ डिसेंबरपासून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीची सदस्यनोंदणी सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली असून त्यानंतर राज्य व शहर प्रतिनिधींची यादी जाहीर केली जाणार आहे. २६ जानेवारी २०१३ पूर्वी सदस्य आणि पक्ष कार्यकारी मंडळाची निवड पूर्ण केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. 

मुंबई शहरासाठीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मयंक गांधी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की रोहा येथे तेथील कांही स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी अरविंद केजरीवाल येणार आहेत. त्यामुळे याच दिवशी महाराष्ट्रासाठीच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करावा असे निश्चित करण्यात आले आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनात सहभागी असलेल्यांपैकी १ हजार जणांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. पक्ष सध्या ३५ जिल्हे आणि ३६ युनिट स्थापनेच्या विचारात असून सदस्य नोंदणीसाठी १० रू. शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क वर्षभरासाठी असेल का आजीवन असेल याचा निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही.

पक्षाच्या घटनेनुसार कार्यालयीन कर्मचारी असणार नाहीत. मात्र मध्यवर्ती पातळीवर समन्वयक, सचिव, खजिनदार असतील असेही ते यावेळी म्हणाले. पक्षाने निवडणूक लढविण्याचा निर्णय केला असल्याने निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्ह काय मागावे याचा विचार सुरू असून चार चिन्हे पक्षाने ठरविली आहेत. त्यानुसार मशाल, मेणबत्ती, शिट्टी अथवा ड्रम यापैकी एक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Comment