लोकमंगलचा सोहळा

marriage2

सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणार्यां सामाजिक संस्थांसमोर मोठा आदर्श उभा केलेला आहे. सध्याच्या काळामध्ये लग्नाचे खर्च वाढत चाललेले आहे आणि लग्न करणार्यां चे नखरेही वाढलेले आहेत. खिशात पैसे नसताना सुद्धा लोक कर्ज काढून लग्न करण्यास उद्युक्त होत आहेत आणि त्यातले बरेच लोक एखाद्या मुलाचा किवा मुलीचा विवाह करून कायमचेच कर्जाच्या पिंजर्या्त स्वतःहून अडकत आहेत. अशा काळामध्ये सामूहिक विवाह आयोजित केले तर लग्नावर होणारी पैशाची उधळपट्टी वाचते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बर्याेच गावातील सामाजिक कार्यकर्ते सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करायला लागले आहेत.

परंतु सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानने आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहळा अशा प्रकारच्या गावोगाव होणार्यार विवाह सोहळ्यांपेक्षा पूर्णपणे आगळावेगळा होता. अशा विवाह सोहळ्यांना मोठा सामाजिक आशय कसा देता येईल, याचे प्रात्यक्षिक लोकमंगल समूहाचे प्रमुख माजी खासदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरातल्या सामूहिक विवाह सोहळ्यातून दाखवून दिले आहे.

या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये २६४ जोडप्यांचे विवाह एकाच वेळी लावले. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर या निमित्ताने अक्षरशः दीड ते दोन लाख लोक जमलेले होते आणि पोलीस बंदोबस्त नसताना सुद्धा स्वयंस्फूर्तीने हा सारा जमाव अतीशय शिस्तीत अक्षता टाकण्यासाठी उभा होता. भारतीयांना बेशिस्त म्हटले जाते आणि जिथे अनेक भारतीय एकत्र येतात तिथे ते शिस्त सोडून वागतात अशी आपली ख्याती आहे. म्हणून नेहमीच कुठेही रांगा लावताना पोलिसांना बोलाविल्याशिवाय पर्याय रहात नाही.

शहरातले लोक काही वेळा शिस्तीत वागतात, परंतु खेडेगावचे लोक शिस्त पाळण्याच्या बाबतीत तुलनेने मागे असतात, असे सरसकट समजले जाते. परंतु काल हरिभाई शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर खेडूत जमलेले असताना सुद्धा कमालीची शिस्त पाळलेली दिसली. या शिस्तीमागे लोकमंगल प्रतिष्ठानचे व्यवस्थापन कौशल्य प्रकर्षाने जाणवले. गेल्या सात वर्षांपासून लोकमंगल प्रतिष्ठान असा उपक्रम आयोजित करत आलेले आहे आणि वरचेवर या प्रतिष्ठानचे सामूहिक विवाहाचे कार्यक्रम अधिकाधिक नेटकेपणाने आणि सुविहितपणाने आयोजित केले जाताना दिसत आहेत.

विवाहाच्या समारंभामध्ये विवाहाइतकेच भोजन व्यवस्थेलाही महत्व असते. किंबहुना लाखभर लोकांची जेवणाची उत्तम सोय करणे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखेच काम असते. थोडा अंदाज चुकला किवा जेवणाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली की, सारा कार्यक्रमच बदनाम होऊन जातो. परंतु लोकमंगलच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था एवढी उत्तम ठेवली होती की, तिच्यात नाव ठेवायला जागा नव्हती. ८०० स्वयंपाकी आणि दोन हजार कार्यकर्ते ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपामध्ये अतीशय नेटकेपणाने हा अन्नयज्ञ चालवत होते.

ग्रामीण भागामध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह मोठ्या प्रमाणावर होतात. महाराष्ट्रात ५० टक्के मुलींचे लग्न अठरावे वर्ष गाठण्याच्या आधीच झालेले असते. परंतु लोकमंगल प्रतिष्ठानने आजवर केलेल्या पंधराशे विवाहांमध्ये विवाहाच्या वयासंबंधीचा कायदा मोडून एकही लग्न झालेले नाही. त्याशिवाय या विवाह समारंभात एकाच विवाह वेदीवर हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा चारही धर्मातील वधूवरांचे विवाह एकदम लावले जातात. आपल्या देशाची उन्नती करायची असेल तर लोकांनी परस्परांच्या जवळ आले पाहिजे, कालमान परिस्थिती वर विचार केला पाहिजे, त्यात निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा केली पाहिजे असे केले तरच आपली प्रगती होणार आहे, असे लोकमान्य टिळकांनी म्हणून ठेवलेले आहे.

परंतु लोकमंगल प्रतिष्ठानने या निमित्ताने जवळपास दोन लाख विविध जाती-धर्माच्या लोकांना एका प्रांगणात एकत्रित केले. एवढे लोक एकत्र येत असतील तर त्यांच्यासमोर कसला तरी सामाजिक संदेश ठेवला पाहिजे याचेही भान लोकमंगल प्रतिष्ठानने ठेवले होते. या विवाह मंडपाला जोडून दुसरे दोन छोटे मंडप टाकण्यात आलेले होते. त्यातल्या एका मंडपात सध्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाय काय करावा याबाबतचे प्रात्यक्षिक ठेवलेले होते. आपण आज पाणी अडवले नाही तर उद्या आपल्याला पाण्याविना जगावे लागेल याची जाणीव या प्रदर्शनातून जनतेला करून देण्यात आली.

या कार्यक्रमाला जोडूनच रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते आणि त्यात साडेतीनशे लोकांनी रक्तदान केले. त्याशिवाय स्वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन करणारे एक छोटे प्रदर्शन होते. ज्यामध्ये सुशिक्षित बेकारांना स्वतःचे उद्योग उभारता यावेत यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आलेले होते. जवळपास २५ छोट्या उद्योगांची माहिती देणारे डिजिटल फलक तिथे लावण्यात आलेले होते आणि अशा शंभर उद्योगांची माहिती संकलित केलेले एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.

Leave a Comment