भाजपातले रामायण

भारतीय जनता पार्टीत नवे रामायण सुरू आहे. राम जेठमलानी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ते भाजपात नेमके कधी आले हे त्यांनाही सांगता येणार नाही इतक्यांदा ते पक्ष बदलत आले आहेत. त्यांना आधी जनसंघाने आणि नंतर भारतीय जनता पार्टीने मोठे केले पण आता ते भाजपातून बाहेर पडले आहेतच पण या आधीही त्यांनी भाजपातून बाहेर पडून  अनेक प्रकारचे उपद्व्याप केले होते. मुळात पाकिस्तानातून भारतात आलेले जेठमलानी हे नामवंत वकील म्हणून ख्यातनाम होते. १९६९ साली महाराष्ट्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लादण्यात आलेल्या खटल्यांत त्यांच्या बाजूने वकील म्हणून लढले आणि त्या निमित्ताने शिवसेनेच्या संपर्कात आले. १९७१ साली ते शिवसेना आणि जनसंघाच्या पाठींब्यावर खासदार झाले. नंतर ते १९७७ साली मुंबईतून जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर ते लोकसभेवर कधी निवडून आलेले नाहीत पण आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर भाजपा आणि शिवसेनेच्या तसेच जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना प्रभावित करून सातत्याने राज्यसभेवर आपली वर्णी लावत गेले. त्यामुळे चंद्रशेखर आणि वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले. १९८७ साली त्यांनी आपली भारत मुक्ती मोर्चा नावाची संघटना स्थापन केली होती. १९९५ साली त्याचे रूपांतर भारत मुक्ती कळघम अशा नावाच्या पक्षात केले. पण नंतर त्यांनी आपल्या या संघटना गुंडाळल्या. ते नंतर एकदा राष्ट्रपतीपदासाठीही उभे राहिले होते. आपल्या देशात स्वतःचा मतदारसंघ नसलेले पण आपल्या चातुर्याच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात सतत काही तरी घडवणारे दोन नेते आहेत. एक आहेत सुब्रमण्यम स्वामी आणि दुसरे आहेत राम जेठमलानी.

या दोघांना मागे एखादा पक्ष असावाच लागतो असे नाही पण ते राजकारणात तेही केन्द्रीय राजकारणात सतत सक्रिय असतात. सुब्रमण्यम स्वामी यांनी २ जी स्पेक्ट्रम भ्रष्टाचाराचा पाठपुरावा केला. त्यांना चार वर्षे वाट पहावी लागली पण शेवटी त्यांनी ए. राजा यांना तुरुंगाची वारी करायला भाग पाडले. ते आता सोनिया गांधी यांच्या मागे लागले आहेत आणि त्यांनी सोनिया गांधी यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याचा निर्धार केला आहे.  मागे जेठमलानी यांनीही राजीव गांधी यांचा असाच पाठपुरावा केला होता. त्यांना बोफोर्स प्रकरणात इंडियन एक्स्प्रेसमधून रोज दहा प्रश्न विचारले होते. राजीव गांधी यांनी जेठमलानी यांना कुत्र्याची उपमा दिली होती. म्हणून जेठमलानी यांनी चिडून आपण असे रोज दहा प्रश्नांतून भुंकणार आहोत असे म्हणून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. शेवटी राजीव गांधी यांचे राजकीय करीयर संपले होते.

या दोघांना त्यामुळेच वन मॅन आर्मी असे म्हटले जाते. त्यांच्यात ही क्षमता असल्यामुळे त्यांना दूर लोटता येत नाही आणि जवळ घेतले तर ते गुणाने रहात नाहीत. १९९८ साली ते राज्यसभा सदस्य होते. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे वाजपेयी त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला तयार नव्हते पण लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना मंत्रिपद द्यावे असा आग्रह धरला त्यामुळे त्यांना नगर विकास मंत्री म्हणून घ्यावे लागले. अर्थात ते वर्षाभरातच बाहेर पडले.  पुन्हा आत आले. २००४ साली तर त्यांनी वाजपेयी यांच्या विरोधात लखनौ मतदारसंघात निवडणूक लढवली. २०१० साली ते पुन्हा भाजपात आले.तरीही त्यांना राज्यसभा सदस्य केले. आता ते गडकरी यांच्या विरोधात बोलून पक्षाच्या बाहेर पडले आहेत. त्यांना पक्षातून कायमचे काढून टाकण्याचा पक्षाचा विचार आहे पण ते शक्य होईल की नाही हे काही सांगता येत नाही.

जेठमलानी यांचे वय ९० वर्षे आहे पण अजूनही त्यांच्यात या सगळ्या उचापती करण्याची क्षमता आहे. ते गप्प बसणारे नाहीत. ते आता बाहेर पडल्यावर गडकरी यांच्या विरोधात एखादी आरोपांची मोहीम चालवणारच नाहीत याची काही शाश्वती देता येत नाही. ते त्यासाठी काँग्रेसची मदतही घेतील ते त्यांना मदतही करतील. एकंदरीत भाजपाला अयोध्येतला राम आणि हा राम जेठमलानी या दोन रामांना कायम जवळ करणेही परवडत नाही आणि कायम लांब ठेवणेही परवडत नाही. या दोन रामांनी भाजपाची गोची केली आहे.  अयोध्येतला राम कधी मते मिळवून देणारा वाटतो तर कधी अडचणीचा वाटतो. राम जेठमलानी यांच्याही बाबतीत असेच घडते. कधी कामाचा वाटतो तर कधी तापदायक ठरतो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत कसलाच निर्णय घेता येत नाही.

राम जेठमलानी पक्षात असले तरी तापदायक असतात आणि पक्षाच्या बाहेर गेल्यानंतर त्यापेक्षा अधिक तापदायक वाटत असतात. गेला महिनाभर ते आत राहून ताप देत होते. आता ते बाहेर राहून ताप देणार असे दिसायला लागले आहे. पक्षातले काही नेते त्यांच्याशी सहमत आहेत. म्हणून त्याही नेत्यांनी पक्षात बंड करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ते आवाहन मानून काही लोक बाहेर पडले तरी त्यांना राम जेठमलानी यांची मते पसंत पडतीलच असे नाही. त्यांची जेठमलानी यांना गरजही नाही. याल तर तुमच्यासह आणि न याल तर तुमच्याविना असा या वन मॅन आर्मीच्या सेनापतीचा बाणा आहे.

Leave a Comment