आदर्श घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवानी यांचे निधन

मुंबई दि. २७- माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते कन्हैयालाल गिडवानी यांचे आज सकाळी नऊच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. शुक्रवारी त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती व नंतर त्यांची जामीनावर सुटकाही केली गेली होती. गिडवानी हे आदर्श सोसायटीचे मुख्य प्रवर्तक होते. घोटाळा चौकशी प्रकरणात सीबीआय वकीलाला लाच दिल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. आदर्श घोटाळ्यात त्यांचे नांव येताच त्यांची राजकीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली होती.

गिडवानी यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात काँग्रेसपासून झाली होती मात्र दीर्घकाळ तेथे कोणतेच पद न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस सोडली हेाती तेव्हा शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले आणि ते आमदार झाले. या काळात त्यांनी ऊस उत्पादक, साखर दर यांसंबंधी सातत्याने प्रश्न लावून धरले होते.ते स्वतः साखर कारखानदार होते. मात्र मुदत संपताच शिवसेनेने कोणतेही नवे पद न दिल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी काँग्रेसने त्यांना प्रवक्तेपद दिले होते.

Leave a Comment