राम जेठमलानी यांचा नवा ‘लेटर बॉम्ब’

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षातून निलंबन झाल्यावरही राज्यसभा सदस्य, माजी मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी आपली तलवार म्यान केलेली नाही. उलट पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबरोबरच आता जेठमलानी यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यावर तोफ डागली आहे. भाजप नेत्यांनी मात्र त्यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले आहे.

रविवारी जेठमलानी यांना पक्षातून निलंबित करून त्यांना शिस्तभंगाबाबत करणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र सोमवारी जेठमलानी यांनी गडकरी यांना अत्यंत जहाल भाषेत आणखी एक पत्र रवाना केले आहे.

‘तुम्ही ज्या वाटेने निघाला आहात त्यावरून तुम्ही तर खड्ड्यात जाणारच आहात; पण सोबत अख्ख्या पक्षालाही तुम्ही खड्ड्यात घालणार आहेत;’ असे जेठमलानी यांनी पक्षाध्यक्षांना सुनावले आहे. याशिवाय; ‘मी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक ज्येष्ठ सदस्य असूनही तुमचे लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते लोकपाल विधेयकाबाबत माझ्याशी एका शब्दानेही बोलले नाहीत. काही नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला पक्षाने काही तरी विचित्र कारणांनी विरोध केल्याचेही मला माध्यमात आल्यावरच समजले;’ असे जेठमलानी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

जेठमलानी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊन आपण त्यांना महत्व देऊ इच्छित नाही; अशा शब्दात जेटली आणि पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी त्यांना झिडकारले.

Leave a Comment