एक ‘आम’ पार्टी

भारतातल्या राजकीय पक्षांचा इतिहास पाहिला तर आपल्याला अनेक आम पक्षांची नावे आठवायला लागतात. ज्यांचा सारा जन्म राजकारणात गेला त्यांनी काढलेले पक्ष तर या क्षणी आठवतातच. आताचे आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एक आपला पक्ष काढला होता. आताचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचाही एक पक्ष होता. तमिळ मनिला काँग्रेस असे त्याचे नाव होते. आताच्या लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांचे पिताजी जगजीवनराम यांचाही काँग्रेस फॉर डेमॉक्रसी नावाचा एक पक्ष होता. त्यात त्यांच्या सोबत हेमवतीनंदन बहुगुणा हेही होते. 

आता भाजपात राम जेठमलानी फार गडबड करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना भाजपातून काढून टाकले आहे.  ते बाहेर पडले असल्याने आपला एक नवा पक्ष नक्कीच स्थापन करतील. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांचाही नवा पक्ष निघत आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी एक पक्ष काढला आहे पण त्याचे नाव काल जाहीर केले आहे. त्यांच्या या पक्षाचे नाव आहे आम आदमी पार्टी. पक्षाचे नाव काय असावे याला काही नियम नाही पण केजरीवाल यांच्या पक्षाचे नाव एखाद्या प्रहसनात किवा विनोदी नाटकात राजकारणाचे विडंबन करण्यासाठी पक्षाचे नाव ठेवतात तसे हे नाव आहे आणि ते काँग्रेसची टवाळी करण्यासाठी ठेवले आहे.

काँग्रेसने २००४ साली आम आदमी च्या नावाने निवडणुका लढवून त्या जिंकल्या होत्या आणि नंतर आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे या आम आदमीकडे पाठ फिरवून त्याच्याशी प्रतारणा केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी दोन महिने डोके लढवून  आपल्या पक्षाचे हे काँग्रेसचा उपहास करणारे नाव शोधून काढले आहे. पुन्हा एकदा नमूद करावेसे वाटते की राजकीय पक्षाचे नाव काय असावे याला काही नियम नाही पण त्याला नियम नसला तरीही त्या नावावरून  आणि त्याच्या नाव ठेवण्यामागच्या भावनेवरून त्या पक्षाच्या भवितव्यावर नक्कीच प्रकाश पाडता येतो.

या पक्षात योगेन्द्र यादव हे निवडणूक अंदाज शास्त्रातले तज्ञ, अभ्यासू, संशोधक आहेत. कोणत्या पक्षाला किती मते पडतात आणि पडू शकतील याचा त्यांनी पार सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यांच्या संशोधक बुद्धीला या आम आदमीच्या पार्टीचे भवितव्य कसे दिसले आहे हे माहीत नाही पण त्यांनी हा पक्ष म्हणजे सामान्य माणसाच्या उद्रेकाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशातल्या काही लोकांना टीव्हीवरून चमकण्याचे शास्त्र फार छान माहीत असते. २४ तास दळण दळण्याचा वसा घेतलेल्या वृत्तवाहिन्यांना काहीच बातम्या नसल्या म्हणजे आता काय दळावे असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे त्यांचा घसा कोरडा पडतो तेव्हा नेमके कसे त्यावर टपकावे आणि  हवा करावी याचे तंत्र त्यांना कळते. त्यातच यादवही आहेत आणि केजरीवालही आहेत.

निवडणुका झाल्या की नाना प्रकारचे ग्राफिक्स आणि आलेख काढून जनमताचा कल कसा कोणाकडून आणि किती वळला आहे याची गणिते मांडणार्याक यादवांना हा आम आदमीचा पक्ष सामान्य माणसाच्या भावनांचा उद्रेक वाटत असेल तर त्यांचे गणितच आपल्याला तपासून घ्यावे लागेल. कारण टीव्ही वरचा आणि जनमानसातला प्रभाव यात खूप अंतर असते.  एखाद्या पक्षाने आपल्या नावात आम आदमी शब्द वापरला म्हणजे तो पक्ष आम आदमीचा होऊन जातो अशी केजरीवाल यांची कल्पना असावी. पण अनेक वर्षांपासून राजकारणात घासणार्याप लोकांना जनमत कसे कसे वळत असते हे कळेनासे झाले आहे. काँग्रेसला एवढी मोठी परंपरा असूनही या पक्षाला आता काही राज्यांत निवडून येणारे तर दूरच पण अनामत राखू शकणारेही उमेदवार मिळेनासे झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्पित कार्यकर्त्यांची एवढी  शिस्तशीर फौज असतानाही एक तृतियांश देशात पाय ठेवायलाही जागा मिळेनाशी झाली आहे. तिथे तीन शहरांत किरकोळ निदर्शने करून आणि चार भाषणे ठोकून केजरीवाल लोकसभेच्या सगळ्या जागा लढवण्याच्या गोष्टी बोलत आहेत.

त्यांनी आपल्या पक्षाचे नाव आम आदमी की पार्टी असे ठेवले असले तरी प्रत्यक्षात तो एक आम आणि सामान्य पक्ष ठरणार आहे. कारण या पक्षाचा आम आदमीशी काहीही संबंध नाही. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला  ३०० लोक उपस्थित होते असे वृत्तपत्रात छापून आले आहे. या ३०० कार्यकारिणी सदस्यांमध्ये आम आदमीचे प्रतिनिधित्व कोण असा प्रश्न पडावा इतके शहरी, उच्च मध्यमवर्गीय पैसेवाले लोक होते. अशा लोकांना सोबत घेऊन पक्षाला आम आदमी पार्टी कसे बनवणार ?  देशाची ७० टक्के लोकसंख्या खेड्यात राहते. परंतु या कथित आम आदमीच्या पार्टीच्या विचारांत आणि कार्यक्रमात खेड्यांतल्या लोकांना आकृष्ट करेल असे काय आहे ? आम आदमीचे नाव घेऊन अनेकांनी पक्ष काढले आहेत पण आपल्या कल्याणाच्या आणाभाका घेऊन निघालेल्या या आम आदमीला या पावसाळी छत्र्यांची दखल ही नाही. 

Leave a Comment