आम आदमीची पार्टी

कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा किंवा त्यांच्या अधिवेशनातले ठराव पाहिले तर सगळीकडे एकच छाप आढळतो. सामान्य माणसाला जास्तीत जास्त सुखी करणे आणि त्याला विविध संधी उपलब्ध करून देणे हेच आपल्या पक्षाचे उद्दिष्ट आहे असे सर्वांनी आपल्या ठरावांमध्ये आणि जाहीरनाम्यात एकमुखाने आणि उच्चरवाने म्हटलेले असते. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात आपल्याला आपल्या देशातल्या श्रीमंत लोकांना श्रीमंत करायचे आहे असे चुकूनही म्हटलेले नसते. सामान्य माणूस म्हणजे आम आदमी हाच आपला केंद्रबिंदू आहे असे त्यांनी म्हटलेले असते.

परंतु प्रत्यक्षात आपण आपल्या सभोवताली पहायला गेलो तर उलटेच झालेले दिसते. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत असतात. खरोखर श्रीमंत लोकांचेच कल्याण झालेले असते आणि ज्याचे कल्याण करण्याच्या आणाभाका राजकीय पक्षाने घेतलेल्या असतात तो आम आदमी मात्र वरचेवर खडतर जीवन जगत असतो. म्हणजे राजकीय पक्षांची कागदावरची धोरणे काहीही असली तरी प्रत्यक्षात त्यांची कृती मात्र त्याच्या नेमकी उलट असते.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसका हाथ आम आदमी के साथ अशी घोषणा केली होती. काँग्रेसची निवडणूक निशाणी हाताचा पंजा असल्यामुळे काँग्रेसने ही घोषणा मोठ्या हुशारीने केलेली होती. म्हणजे एकाच घोषणेमध्ये हाताचाही प्रचार झाला आणि आम आदमीला त्याच्या कल्याणाचे खोटे का होईना पण आश्वासन मिळाले.

प्रत्यक्षात मात्र काँग्रेसच्या राजवटीत आम आदमीचे सर्वाधिक हाल झाले. त्याला स्वस्तात धान्य देण्याच्या योजनेला वारंवार होत असलेला विलंब, सगळ्या गोष्टीची झालेली महागाई, शिक्षण हाताबाहेर जाणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दरवाढींची डोक्यावर असलेली कायमची कुर्हा ड या मार्गाने आम आदमी अक्षरशः जीवाला कंटाळून गेला. ज्याच्या कल्याणाची काँग्रेसने शपथ घेतली तो पिचला गेला आणि ज्याच्या कल्याणाचे आश्वासन दिले गेले नव्हते तो धनिक वर्ग मात्र कैक पटींनी श्रीमंत झाला.  देशामध्ये करोडपती असलेले लोक अब्जोपती झाले आणि नानातर्हेनचे भ्रष्टाचार करून का होईना श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत गेले. आम आदमीची शोकांतिका झाली.

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केला असून  त्या पक्षाला आम आदमी पार्टी असे नाव दिलेले आहे. त्यांनी हे नाव जाहीर करताच काँग्रेस पक्षाला मिरच्या झोंबल्या. कारण केजरीवाल यांनी आपल्या पक्षाचे हे नाव ठेवण्यातून एक उपहास केलेला आहे. काँग्रेसने आम आदमीच्या कल्याणाचे कंकण बांधल्याची घोषणा केली असली तरी त्या पक्षाने काही गरीबांचे कल्याण केलेले नाही. आम आदमी हा काँग्रेसच्या केवळ जाहीरनाम्यात आहे आणि हा पक्ष गरीबांचे खरे कल्याण करू शकत नाही, करतही नाही. तेव्हा आमचा नवा पक्ष हाच आम आदमीचा खरा पक्ष आहे. ही गोष्ट केजरीवाल यांच्या या नामकरणातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी मोठा थयथयाट केला आहे.

आम आदमी हा शब्द काँग्रेसशीच जुडलेला आहे आणि आजवर काँग्रेस पक्षाने आजवर आम आदमीलाच साथ दिलेली आहे तेव्हा केजरीवाल यांनी आपल्या पक्षाचे असे नाव देण्यात काही अर्थ नाही असे अजब तर्कट तिवारी यांनी लढविले आहे. देशातला आम आदमी हा काही काँग्रेसचा शोध नाही. देशातल्या सामान्य माणसांच्या कल्याणाचे काँग्रेसने काही कंत्राट घेतलेले नाही. तेव्हा केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या नावात आम आदमी हा शब्द वापरला म्हणून तिवारी यांनी थयथयाट करण्याचे कारण नाही.

काँग्रेसला देशातल्या आम आदमीचा पुळका असेलही. तो कितपत खरा आहे, हा वेगळा विषय आहे. परंतु आम आदमी हा शब्द काँग्रेसशिवाय कुणी वापरूच नये हा तिवारींचा हट्ट त्यांच्या नैराश्याचे दर्शन घडवतो. आम आदमी हा काँग्रेसचाच शोध असेल आणि काँग्रेस पक्ष गेल्या ६०-७० वर्षांपासून आम आदमीचे कल्याण करण्याचा वसा घेऊनच उभा राहिला असेल तर साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की, सतत सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाने आम आदमीच्या कल्याणाचे असे कंकण  आपल्या हाती बांधले असेल तर हा आम आदमी इतकी वर्षे आमच कसा राहिला. त्याची सुधारणा होऊन तो खास आदमी का झाला नाही? 

म्हणजे आम आदमीची खरी सुधारणा घडवण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. आम आदमी हा आमच रहावा, तो सतत गरीबच रहावा आणि काँग्रेस पक्षाने सातत्याने या गरीब माणसांच्या नावाने छाती पिटून त्यांच्या कल्याणाचे ढोंग करून सत्तेवर यावे असाच काँग्रेसचा सुरूवातीपासूनचा कार्यक्रम आहे. म्हणजे देशातली गरिबी ही काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीसाठी अनुकूल ठरलेली आहे. म्हणून त्यांनी आजवर गरिबी  टिकविण्याचे काम केलेले आहे.

Leave a Comment