शत्रुघ्न सिन्हांची गच्छंती अटळ

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचीही गच्छंती होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनाही कडक समाज दिली जाणार आहे.

जेठमलानी यांनी भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेले भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालक पदी रणजीत सिन्हा यांच्या नियुक्तीला भाजपने आक्षेप घेतला असताना पक्षाच्या भूमिकेला छेद देऊन जेठमलानी यांनी सिन्हा यांच्या नियुक्तील्चे समर्थन केले.शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील या दोन्ही मुद्द्यांवर जेठमलानी यांची तळी उचलून धरली.

पूर्ती प्रकरणी गडकरी दोषी नसले तरीही सार्वजनिक जीवनात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची प्रतिमा निर्विवाद असावी यासाठी गडकरी यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणी सिन्हा यांनी केली आहे.

याप्रकरणी विचार करण्यासाठी पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत शत्रुघ्न सिंह यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला जाईल; तर यशवंत सिन्हा यांच्या ज्येष्ठतेचा विचार करून त्यांच्यावर त्यांचे विधान मागे घेण्यासाठी दबाव आणला जाईल; असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment