नाशिक: महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारण नेहेमीच कुतूहलाचा विषय राहिले आहे. त्यामुळेच अनेक नाटक चित्रपटांनाही हा विषय आकृष्ट करतो. मात्र या ग्रामीण राजकारणातील चुरस आता इतकी वाढत चालली आहे की सरपंचपदाच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी एका उमेदवाराने आपल्या समर्थकांना राजस्थान सैर घडविली. ती ही चक्क हेलीकॉप्टरने!
ग्रामपंचायत सदस्यांची हेलीकॉप्टर वारी
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी, दगाफटका व्हायला नको म्हणून सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत गतीर यांनी आपल्या समर्थक सदस्यांना एका हेलीकॉप्टरमध्ये घातले आणि थेट राजस्थान गाठले. ऐन मतदानाच्यावेळीच त्यांना पुन्हा गावात आणण्यात आले. ते ही हेलीकॉप्टरमधूनच. या निमित्ताने या सदस्यांना आयुष्यात प्रथमच हेलीकॉप्टरवारी तरी घडली!