संघाच्या आशीर्वादाने गडकरींची दुसरी टर्म निश्चित

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शिफारशीने भ्रष्टाचाराचे आरोप असूनही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा सलग दुसर्या वेळी अध्यक्षपद भूषविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा भाजपच्या सूत्रांनी केला आहे.

गडकरी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या पूर्ती उद्योग समूहात अनेक अनियमितता असल्याचा आणि त्यांनी राजकीय वर्चस्वाचा उद्योग विस्तारासाठी उपयोग केल्याचा आरोप केला जात आहे. पक्षातूनही गडकरी यांना पुन्हा अध्यक्षपद देण्यास विरोध होत आहे. राम जेठमलानी आणि यशवंत सिन्हा यांनी तर आताच गडकरी यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणी केली आहे. मात्र संघाचे ‘नैतिक लेखा परीक्षक’ एस. गुरुमूर्ती यांनी गडकरी यांच्या ‘उद्योगाचे लेखापरीक्षण’ करून त्यांना ‘क्लीन चीट’ दिल्याने संघ गडकरी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा दावा सूत्राने केला.

दरम्यान; गडकरी यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याबरोबरच अनेकदा पक्षाच्या भूमिकेला छेद देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल; असे पक्षाचे प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी पत्रकारांना सांगितले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेठमलानी यांनी गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याच प्रमाणे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालक पदी रणजीत सिन्हा यांच्या नियुक्तीला भाजपने आक्षेप घेतला असताना जेठमलानी यांनी गडकरी यांना पत्र पाठवून सिंह यांच्या नियुक्तीला पाठिंबा व्यक्त केला आणि पक्षाच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

Leave a Comment