संवैधानिक संस्था दुबळ्या करण्याचा सरकारचा डाव: नायडू

हैदराबाद: केंद्र सरकार संवैधानिक संस्थांवर आपल्या मार्जीतील माणसांची नियुक्ती करून त्यांना निष्प्रभ करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्याकैय्या नायडू यांनी केला. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रमुख पदी केलेली रणजीत सिन्हा यांची नियुक्ती रद्द करावी; अशी मागणीही त्यांनी केली.

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार राजकीय लाभाची पोळी भाजून घेण्यासाठी संवैधानिक संस्थाना दुबळे बनवीत असून सीबीआयच्या सर्वोच्च पदी सिन्हा यांची नियुक्ती करण्याचा सरकारचा आधीपासूनच डाव होता कारण सिंह हा काँग्रेसचा ‘खास’ माणूस आहे; असा आरोप त्यांनी केला. या नियुक्तीपूर्वी राज्यसभेने नियुक्त केलेल्या समितीला विचारात घ्यायला हवे होते; असेही नायडू म्हणाले.

दरम्यान; भाजपचेच ज्येष्ठ खासदार आणि माजी मंत्री बॅ. राम जेठमलानी यांनी सीबीआय संचालक पदाच्या नियुक्तीला विरोध करण्याच्या आपल्या पक्षाच्या भूमिकेला छेद दिला आहे. या पदासाठी सिन्हा हेच सर्वाधिक पात्र अधिकारी असून त्यांच्या स्पर्धेतील दुसरा अधिकारी या पदाला अपात्र असल्याचे पुरावे देण्याची आपली तयारी आहे; असे त्यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सिन्हा यांच्या नियुक्तीला विरोध करण्याची पक्षाची भूमिका आश्चर्यकारक असल्यचेही जेठमलानी यांनी पत्रात नमूद केले आहे.