दुधाच्या महापुरात आपण कोरडेच

milk

भारतामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या कोणत्याही क्रांतीचा शेतकऱ्याना फारसा फायदा होत नाही असे गेल्या पंचवीस वर्षात दिसून आले आहे. हरित क्रांती, धवल क्रांती आणि फलोद्यान क्रांती अशा तीन क्रांत्या गेल्या चाळीस वर्षात झालेल्या आहेत. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा धान्याच्या बाबतीत परावलंबी होता. १९४८ पासून १९७० सालपर्यंत आपल्याला लागेल एवढे गहू आणि तांदूळ आपण उत्पादन करू शकत नव्हतो आणि  त्यांच्या आयातीवर अवलंबून होतो. १९७० नंतर हरित क्रांतीमुळे हे परावलंबन कमी झाले आहे. या हरित क्रांतीच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करण्यासाठी दुधाचा महापूर योजना सुरू करण्यात आली. ती दोन टप्प्यात राबविण्यात आली.

१९९० नंतर महाराष्ट्रात फलोद्यान क्रांती झाली. या तिन्ही क्रांत्या परिपूर्ण नसल्या तरी उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्या उपयुक्त ठरल्या. आता देशामध्ये गहू आणि तांदूळ आयात करावे लागत नाहीत. दुधाचेही उत्पादन गरजेपेक्षा अधिक झाले आहे आणि सगळ्या प्रकारच्या फळांची सुध्दा तुलनेने अधिक उपलब्धता झालेली आहे. या सगळ्या क्रांत्यांच्यामध्ये एक गडबड झालेली आहे. त्यामध्ये उत्पादन वाढीवर जोर देण्यात आला. परंतु उत्पादन वाढवताना शेतकर्यां नासुध्दा चांगला नफा व्हावा असा दृष्टीकोन ठेवण्यात आला नाही. त्यामुळे म्हणजेच मार्केटिंग क्रांती न झाल्यामुळे उत्पादन वाढ होऊन सुध्दा शेतकरी गरीबच राहिला.

हरित क्रांतीने देश धान्यात स्वावलंबी झाला पण ते धान्य पिकवणारा शेतकरी कर्जबाजारी झाला. दुधाची उपलब्धता खूप झाली पण शेतकऱ्याच्या मुलांनाच दूध मिळेना आणि दुधाचे अतिरेकी उत्पादन झाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्यासुध्दा अडचणीत आला. आपल्या देशामध्ये धान्य आणि दूध या दोन्हीच्या बाबतीत उत्पादनाचे आकडे मोठ्या कौतुकाने सांगितले जात असतात. एकेकाळी अमेरिकेच्या गव्हावर जगणारा हा भारत देश आता अन्य देशांना गहू निर्यात करत आहे आणि देशातली गव्हाची गोदामे ओसंडून वाहत आहेत. लाखो टन गहू कुजत चालला आहे. तीच अवस्था दुधाची आहे. दूध भरपूर शिल्लक राहत आहे आणि दूध जादा झाल्यामुळे  दुधाची खरेदी विक्री करणारे दूध संघ दुधाचे भाव कमी करायला लागले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी दूध रस्त्यावर टाकून देत आहेत.

शिल्लक धान्याच्या आणि दुधाच्या या बातम्या वाचल्या म्हणजे आपला देश किती श्रीमंत झाला आहे असे वरकरणी तरी वाटू शकते. परंतु वस्तुस्थिती विदारक आहे. धान्याचे गोदाम भरलेले आहे. परंतु त्या गोदामाच्या शेजारच्या झोपडपट्टीत राहणार्याु मुलांना दोन वेळा पोटभर जेवायला मिळत नाही. त्या लोकांमध्ये दोन वेळा पोटभर जेवता येईल एवढे धान्य खरेदी करण्याची ऐपत नाही आणि त्यामुळे गोदाम ओसंडून वाहत आहे. झोपडपट्ट्यातल्या मुलांची दोन वेळच्या अन्नाची ही परिस्थिती असेल तर दुधाची परिस्थिती काय असेल ह सांगण्याची गरजच नाही. सकाळी उठल्यानंतर मुलगा दूध पितो आणि शाळेतून आल्यानंतर पुन्हा संध्याकाळी एक ग्लासभरून दूध रिचवतो. ही शहरातल्या केवळ काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांची परिस्थिती आहे.

गरिबांच्या मुलांना किमान पोषण होईल एवढे दूध अधूनमधूनसुध्दा प्यायला मिळत नाही. ही तर शोकांतिका आहेच पण ज्या मुलांना दूध प्यायला मिळते ती मुले दूध पीत नाहीत. त्यांना चहा, कॉफीची आणि थंड पेयांची सवय लागलेली आहे. अशा रितीने आपल्या महाराष्ट्रातला दुधाचा हा महापूर दूध वापरले जात नाही म्हणून आलेला आहे. गरिबांच्या मुलांमुलींना भरपूर दूध प्यायला मिळाले असते आणि श्रीमंतांची मुले थंड पेयांची ऐवजी दूध पीत असती तर हा दुधाचा वापर झाल्यानंतरही दूध शिल्लक राहिले असते तर ते खरे शिल्लक दूध म्हणता  आले असते. पण मुलांना न पाजता आणि कोणत्याही प्रकारे न वापरता जे दूध शिल्लक राहत आहे ते दूध समृध्दीचा संकेत देत नसून उलट दारिद्रयाची वस्तुस्थिती सांगत आहे.

आपल्या देशामध्ये झालेल्या या क्रांत्यामधला हा एक दोष आहे. आपण धान्याचे उत्पादन वाढवले परंतु सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती ते धान्य वापरण्याएवढी वाढवली नाही. दुधाच्या उत्पादनाचा महापूर आणला परंतु  ते दूध पिऊन भारताची भावी पिढी सक्षम होईल अशी व्यवस्था केलीच नाही. त्यामुळे एक तर दुधाचा महापूर येऊन तरुण पिढी कोरडीच राहिली आणि त्यांच्याकडून मागणी न आल्यामुळे दुधाचे भाव कोसळले. परिणामी हा महापूर आणणारा शेतकरी सुध्दा कोरडा राहिला.

दुधाची राज्याच्या अंतर्गत मागणी वाढली नसली तरी  तिला बाहेरून मागणी वाढविता आली असती. देशातली काही राज्ये दुधाच्या बाबतीत स्वावलंबी नाहीत. त्यांच्याकडे दूध निर्यात करता आले असते किंवा दुधावर प्रक्रिया करून काही दुग्धजन्य पदार्थ तयार करून दुधाचा वापर वाढवता आला असता. अमूल दूध योजनेने हेच केलेले आहे. त्यामुळे दूध विक्रीचा प्रश्नही सुटला आणि शेतकऱ्याना दुधाचा चांगला भाव देता आला. महाराष्ट्रातल्या दुधाच्या महापुराच्या योजनेत केवळ उत्पादनावर भर देण्यात आला आणि मार्केटिंगकडे दुर्लक्ष झाले त्याचा हा परिणाम आहे.

Leave a Comment