गडकरी हटाव मोहिमेला शत्रुघ्न सिन्हांचा पाठींबा

पाटणा: भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या मागणीला आपला ‘तात्विक’ पाठींबा असल्याचे ज्येष्ठ सिनेअभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी जाहीर केले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि राम जेठमलानी यांनी गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानी उपस्थित केलेला मुद्दा दुर्लक्ष करण्याजोगा नाही; अशी टिपण्णी शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.
गडकरी हे प्रामाणिक आहेत. मात्र सार्वजनिक जीवनात एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने केवळ प्रामाणिक असणे पुरेसे नाही; तर ती प्रामाणिक आहे हे दिसलेही पाहिजे; असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले.

केंद्रीय अन्वेषण विभागासारखी महत्वाची संस्था नेतृत्वहीन राहणे योग्य नव्हे असे सांगून पक्षाच्या भूमिकेला छेद देत सीबीआयच्या संचालक पदावर रणजीत सिन्हा यांच्या नियुक्तीचे समर्थन करण्याच्या जेठमलानी यांच्या भूमिकेलाही सिन्हा यांनी पाठींबा दिला.

देशाच्या पंतप्रधान पदासाठी पक्षात लालकृष्ण अडवानी हे सर्वात पात्र नेते असल्याचेही सिंह म्हणाले.

Leave a Comment