शालेय अभ्यासक्रमात बाळासाहेबांचे चरित्र हवे

मुंबई दि.२३- सेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक ठिकाणांना त्यांचे नांव देण्याची मागणी होत असतानाच मुंबई महापालिकेतील नगरसेवक व लॉ कमिटी अध्यक्ष राजू पेडणेकर यांनी बाळासाहेबांचे चरित्र शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट केले जावे असा प्रस्ताव स्टेट कौन्सिल एज्युकेशन रिसर्च अॅन्ड ट्रेनिंगपुढे मांडला असल्याचे वृत्त आहे. या संस्थेचे अध्यक्ष एन. के. जगन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पेडणेकर यांच्या मते बाळासाहेबांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होते आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकणार आहे. उत्तम वक्तृत्त्व, जाज्वल्ल देशाभिमान, कणखर नेतृत्त्व आणि शून्यातून उभी केलेली संघटना यातून विद्यार्थ्यांना पुष्कळ शिकता येणार आहे म्हणून असा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. शिक्षण मंडळाचे जगन यांच्या मते हा प्रस्ताव मान्य होऊ शकतो मात्र त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल.

सध्याची शालेय इतिहासाच्या पुस्तकातील मजकुरात नव्याने मजकूर समाविष्ट करण्याची गरज गेली कांही वर्षे व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना फार जुन्या गोष्टी लक्षात ठेवणे अवघड असते आणि त्यात रूचीही कमी असते. मात्र २००० सालानंतरच्या घटना इतिहासात समाविष्ट करायच्या असतील तर त्यासाठी राज्यशासनाची परवानगी आवश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल केला जात आहे मात्र तो हळूहळू केला जात आहे. सध्या दहशतवादाबाबतची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्त्व आणि एकूणच जीवनपट प्रेरणादायी आहे यात शंका नाही असे यावेळी बोलताना जगन यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment