अफझल गुरूला फाशी दिल्यास घातपाताची धमकी

श्रीनगर: काश्मिरी दहशतवादी अफझल गुरु याला फाशी दिल्यास देशभरात मोठ्या प्रमाणावर घातपात घडवून अनु; अशी धमकी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासीन मलिक याने दिली आहे.
मुंबईवर हल्ला करणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर आता संसदेवर हल्ला करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारा काश्मिरी दहशतवादी अफझल गुरु याला देखील फासावर लटकवा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर यासीन मलिकने भारत सरकारला धमकी दिली आहे. यापूर्वी जेकेएलएफचा संस्थापक मकबूल भट्ट याला फाशी देऊन भारतीय सरकारने मोठी चूक केली आहे. आता गुरूला फाशी देऊन या चुकीची पुनरावृत्ती केल्यास देशभर हिंसाचाराचा डोंब उसळवीला जाईल; अशी धमकी मलिक याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दुसरीकडे पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या सरबजीत सिंग याचा दयेचा अर्ज फेटाळून लाऊन त्याला फाशी द्यावे; अशी मागणी पाकिस्तानात होऊ लागली आहे. मात्र सरबजीतच्या अर्जाचा निर्णय घेताना त्याचा संबंध सूड बुद्धीने कसाबच्या फाशीशी लावला जाणार नाही; अशी ग्वाही पाक गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिली आहे.