बाळासाहेबांच्या जन्मस्थळावर नीलफलक

पुणे दि. २२ – शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे याचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या पुण्यातील सदाशिव पेठेतील इमारतीवर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नीलफलक लावण्याचा निर्णय झाला असून इमारतीचे मालक रमेश कुंवर यांनी त्यासाठी आनंदाने परवानगी देण्याची तयारी दाखविली आहे असे समजते.

सुमारे ९० वर्षांपूर्वी ३४५ दातार वाडा, सदाशिव पेठ असा पत्ता असलेल्या वाड्यात प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य होते. ते येथे भाड्याच्या जागेत रहात होते आणि येथेच २३ जानेवारी १९२६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता. काळाच्या ओघात जुना वाडा नष्ट झाला आणि शहराच्या विकासामुळे पोस्टाचा पत्ताही बदलला. आता या जागी सार्थक नावाची इमारत असून त्यांच्या पत्ता आहे ८९६, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे.

बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक कुठे केले जावे याची चर्चा जोरावर असतानाच त्यांचा जन्म झालेल्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ नीलफलक लावण्याचा विचार सुरू झाला. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू समिती या खासगी संस्थेतफर्े गेल्या दशकभरात पुण्यात ज्या ज्या मान्यवरांचे वास्तव्य होते त्या इमारतींवर असे नीलफलक लावले जातात. माजी विधानपरिषद स्पीकर आणि माजी आमदार जयंतराव टिळक यांनी या उपक्रमाची सुरवात केली होती आणि आज हा उपक्रम त्यांचे चिरंजीव डॉ.दीपक टिळक पुढे चालवित आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतरच त्यांचा जन्म पुण्यातील या जागेत झाला होता याची माहिती अनेकांना झाली.

या विषयी बोलताना डॉ.दीपक टिळक म्हणाले की गेल्या दशकात आम्ही अशा प्रकारे ३०० इमारतींवर नामवंतांचे स्मरण म्हणून नीलफलक लावले आहेत. त्यात साहित्यिक, संगीतकार, समाज सुधारक, राजकारणी, गायक अशा सर्व क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. आता प्रबोधनकार ठाकरे जेथे राहात होते आणि जिथे बाळासाहेब जन्मले आणि त्यांच्या बालपणाची कांही वर्षे गेली त्या जागेवर असा नीलफलक लावावा अशी विनंती सेना नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. इमारतीच्या मालकांकडून रितसर लेखी परवानगी घेऊन हा फलक लावला जाईल.

Leave a Comment