जॉब्जचे घर फोडणारयाला सात वर्षांची शिक्षा

सॅन फ्रॅन्सिस्को दि. २२ – अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याच्या घरी घरफोडी करणार्यानने आणखी सात ठिकाणीही घरफोड्या केल्या असल्याची कबुली न्यायालयात दिली असून त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. करिथ मॅकफर्लिन असे या चोराचे नाव असून तो मूळचा विक्रेता होता मात्र नोकरी गेल्याने तो बरोजगार झाला होता. त्यापोटी त्याला राहायला घरही उरले नव्हते असे समजते. मार्च २०११ मध्ये त्याने ही चोरी केली होती.

सर्वात मजेची बाब अशी की या चोरट्याला त्याने स्टीव्ह जॉब्जच्या घरात चोरी केली आहे याची कल्पनाच नव्हती. जॉब्ज याच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते आठवडाभर या घरासमोर फुले ठेवत होते .जॉब्जच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी हे घर दुरूस्तीला काढण्यात आले. तेव्हा मॅकफर्लिनने या घरात शिरून ६० हजार डॉलर्स किमतीचे दागिने, अनेक संगणक तसेच जॉब्जचे वॉलेट पळविले. विशेष म्हणजे त्याने पळविलेला आयपॅड जेव्हा रिइन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा आयपॅड अॅपलच्या सर्व्हरला जोडलेला असल्याने तो कुठल्या भागातून वापरला जात आहे याची कल्पना कंपनीतील तज्ञांना आली आणि त्यानुसार पोलिसांनी मर्कफर्लिनला पकडले. तेव्हा त्याने आपण आणखीही सात घरफोड्या केल्याची कबुली दिली आणि चोरीचा माल ज्या लॉकरमध्ये ठेवला होता तोही परत केला.

मॅकफर्लिनने ताप्तुरती रिकामी अथवा दुरूस्तीसाठी काढलेली घरेच फोडली असून बरेच वेळा रात्री तो या घरातच झोपतही असे. त्याला रहायला घरच नसल्याने अन्य वेळी त्याचा मुक्काम गाडीत असे असेही समजते.