जशास तसे

भारत सरकारने मुंबई हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब याला फासावर लटकावून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. आपण जशास तसे ही संकल्पना नेहमी चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याने कसाबला फाशी दिली हे जशास तसे उत्तर कसे ठरते, असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवू शकतो. कारण त्यांनी तर आपल्यावर छुपा हल्ला केला होता आणि आपण तर त्याला कायद्याने बचाव करून घेण्याच्या सगळ्या सवलती देऊन न्याय्य मार्गाने फासावर लटकावले आहे. त्याने आपल्यावर छुपा हल्ला केला होता. त्याला जशास तसे उत्तर द्यावयाचे असेल तर आपणही पाकिस्तानवर असाच छुपा नाही तरी उघड का होईना हल्लाच करायला हवा होता, त्यांनी मुंबईवर हल्ला केला होता मग आपण जशास तसे उत्तर देण्यासाठी कराचीवर तसाच हल्ला करायला  हवा होता, तसेच कराचीतल्या लाखो लोकांना वेठीस धरायला हवे होते. कसाबने आणि त्याच्या सहकार्यांसनी मुंबईतल्या १७६ लोकांना मारले तसे आपणही कराचीतल्या  २०० लोकांना मारायला हवे होते. तेच खरे जशास तसे उत्तर असते आणि त्यातच खरा पुरुषार्थ असतो असे मानणारे अनेक लोक आपल्या समाजात आहेत.

विनोबा भावे हे अशा उत्तराची फार चांगली मीमांसा करीत असत.  ते म्हणत असत की तलवारीला तलवारीने उत्तर देणे हे  काही जशास तसे उत्तर ठरत नाही. तलवारीला ढालीने  उत्तर देणे हे खरे जशास तसे उत्तर असते. तलवारीला तलवारीने उत्तर देण्याने तलवारीचा घाव घालण्याची प्रवृत्ती अडवली जात नाही, पण ढालीने उत्तर दिल्यास घाव घालण्याची प्रवृत्ती अडवली जाते.तसे पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला त्याला कराचीवर हल्ला करणे हे काही उत्तर ठरत नाही.

अजमल कसाब हा अतिरेकी हाती आला होता. त्याने आपल्यावर ज्या पद्धतीने हल्ला केला त्या पद्धतीने आपण त्याच्यावर हल्ला केला असता तर ते उत्तर चुकीचे ठरले असते. त्याऐवजी आपल्या सरकारने न्यायाची पूर्ण प्रक्रिया राबवून, त्याला त्याचा बचाव करण्याची केवळ मुभा दिली. एवढेच नाही तर त्यासाठी मदत देऊन त्याची बाजू मांडण्याची सोय करून दिली.  उघड्या न्यायालयात त्याचा आरोप कायद्याने सिद्ध करून त्याला मृत्युदंडाची सजा दिली आहे. हेच खरे जशास तसे उत्तर आहे आणि त्यालाही पुरुषार्थ लागत असतो. कारण मानवाच्या विकासाच्या वरच्या अवस्थेत उत्तर देण्याच्या कल्पनाही उच्च दर्जाच्या झालेल्या असतात. या अवस्थेत प्रश्न परिपक्वपणे हाताळताना, हल्ला करणार्याप माणसाला नष्ट करण्यापेक्षा त्याच्यातली हल्लेखोर मनोवृत्ती नष्ट करण्यावर भर दिला जात असतो.

प्रत्येक माणसात दुर्गुण असतो. तो दुर्गुण नष्ट करायचा की दुर्गुणाबद्दल माणसाला नष्ट करायचे ? असा प्रश्न आला तर आपण दुर्गुण नष्ट केला पाहिजे असेच म्हणणार. प्रत्येक दुर्गुणाबद्दल माणसालाच नष्ट करीत गेलो तर माणूसच शिल्लक राहणार नाही. तेव्हा हल्ल्याला उत्तर हल्ला नाही. हल्ल्याला उत्तर कायद्याने शिक्षा देणे. आपण तसेच उत्तर दिले आहे. कसाबची कसाब करणी फार वाईट होती म्हणून त्याला फाशी दिली पण ती खरी पाकिस्तानला दिलेली शिक्षा आहे आणि त्यातून पाकिस्तानची दहशतवादी प्रवृत्ती कमी होण्यास मदत होणार आहे. 

भारताने पाकिस्तानला दिलले हे उत्तर फार समर्पक आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा अनेकांनी रागाच्या भरात येऊन आता पाकिस्तानला ताबडतोब धडा शिकवा असा आग्रह धरला होता. पण आपल्या सरकारने तो आग्रह न मानता  परिपक्वपणाने कायद्याचा मार्ग अवलंबिला. कसाबला पकडल्या बरोबर गोळ्या घातल्या असत्या तर ती त्याची हत्या आपल्याला राजनैतिक दृष्ट्या काहीही देऊन गेली नसती पण आता आपण सारी न्यायाची प्रक्रिया पूर्ण करून  त्याला शिक्षा दिली असल्याने पाकिस्तानचे सुसंस्कृत जगात नाक कापले गेले आहे. घाईने कसाबला जागीच गोळ्या घातल्याने आपल्याला हे साध्य झाले नसते. आपल्याला पाकिस्तानला याच मार्गाने धडा शिकवावा लागेल.

पाकिस्तान आपल्या देशात कारवाया करतो म्हणून त्याची आज जगात काही इभ्रत राहिलेली नाही पण आपण त्याला न्यायाच्या मार्गाने उत्तर देतो म्हणून आपली प्रतिमा चांगली आहे. कसाब हा केवळ १० लोकांना भारतात घेऊन आला होता आणि या मोजक्याच लोकांनी मुंबई शहराला ७२ तास वेठीस धरले होते पण ही किमया काही केवळ १० लोकांची नाही. तिला स्थानिक आणि परदेशातल्याही अनेक लोकांनी मदत केली आहे. त्याशिवाय हे काम साधलेले नाही. त्यातले काही देशद्रोही विषारी साप अबु जुंदालच्या रूपाने आपल्या हातात आले आहेत. त्यांनाही याच मार्गाने ठेचले पाहिजे. अबु जुंदाल हा तर महाराष्ट्रातला आहे. आपण त्याची स्थिती पाहिलेली आहे. आपण ज्या देशात जन्मलो आणि वाढलो तिच्याशी इतकी नमकहरामी करावी एवढा काही मोठा अत्याचार त्याच्यावर होत नव्हता पण डोकी फिरवून टाकणारा धर्मवेडेपणा आणि चुकीच्या कल्पना यामुळे तो खाल्ल्या घराचे वासे मोजायला प्रवृत्त झाला. अशाही अस्तनीतल्या निखार्यांपना वेचून कसाबच्या मार्गाने धाडले पाहिजे तरच ही देशद्रोही वृत्ती नष्ट होईल.

Leave a Comment