महाराष्ट्राची शान गेली

सहा वर्षांपूवीं प्रमोद महाजन गेले आणि आता बाळासाहेब ठाकरे गेले. महाराष्ट्रात सामान्य जनतेत पाळेमुळे रोवून बसलेल्या काँग्रेसला एकदा तरी पराभूत करून पहिले बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आणण्याची किमया करणार्याे भाजपा-सेना युतीचे दोन मुख्य शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेले. या दोघांनी रणनीती आणि जनतेच्या मनाला हात घालणारे वक्तृत्व यांच्या जोरावर महाराष्ट्रात हा चमत्कार कसा केला होता याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तरीही बाळासाहेबांनी आपल्यासाठी किंवा आपल्या मुलासाठी या सत्तेत एखादे पद मागितले नाही. ते त्यांनी मागितले असते तर त्यांना कोणी नकार दिला नसता पण त्यांनी ठाकरे घराण्यातला कोणीही आमदार खासदार होणार नाही असे जाहीर करून टाकले. तो शब्द शेवटपर्यंत पाळला.

सत्तेवर आल्यावर महाराष्ट्राचा विकास कसा करावा, पाटबंधारे योजना कशा उभाराव्यात इत्यादी लंबीचौडी भाषणे ते देत बसले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला होता पण त्या अधिकारात त्यांनी सरकारला आधी आदेश दिला की, माझ्या या महाराष्ट्रात एकाही गरीब माणसावर उपाशी झोपण्याची वेळ येता कामा नये. त्याच्यासाठी निदान पोटाला झुणका भाकरी तरी मिळाली पाहिजे आणि तीही केवळ एक रुपयात मिळाली पाहिजे. हाती सत्ता आल्यानंतर उन्मत्त होणारे अनेक लोक आपण अनेकदा पाहिले आहेत पण सत्ता हाती आल्याच्या क्षणी उपाशी माणसाची अशी आठवण करणारा नेता दुर्मिळच म्हणावा लागेल.

बाळासाहेब   ठाकरे यांना अशी सामान्य माणसाची आठवण आली कारण त्यांच्या राजकारणाचा तो केंद्र बिंदू होता. त्यांच्या चिंतनात तोच माणूस होता. गरिबांचा नकली कळवळा दाखवणारे लोक काही राजकारणात कमी नाहीत पण त्यांना सत्ता हाती आल्याच्या क्षणाला तो आठवत नाही. ते नंतर एखाद्या मेळाव्यात बोलताना कधी तरी गरिबांच्या नावाने नक्राश्रू गाळतात पण त्यांच्या हातून अशी लोकाभिमुख कृती कधी होत नाही. ज्याच्या ध्यानी मनी स्वप्नी गरीब माणूस असतो त्यालाच सत्तेचा स्वीकार करताना तो आठवतो.

बाळासाहेबांनी आपल्या सरकारकडून करवून घेतलेली एक मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी रेशन दुकानातल्या साखर, तेल, दाळ, गहू आणि तांदूळ अशा पाच वस्तूंचे दर पाच वर्षे आहेत तसेच राहतील अशी घोषणा करायला लावली. बाळासाहेब ठाकरे हा खरेच सामान्य माणसाचा नेता होता.  म्हणून त्यांनी समाजाच्या कोणत्या वर्गातून नेते निर्माण केले हे पाहण्यासारखे आहे. ज्यांच्या घरात पाटीलकी आणि  देशमुखी आहे त्यांना सत्तेवर आणणे सोपे असते पण ज्यांच्या घरात कोणी आपल्याला कधी मंत्रिपद मिळेल असे स्वप्नही पाहिले नव्हते अशा अतीशय सामान्य कुटुंबातल्या लोकांना बाळासाहेबांनी सत्तेवर आणले. वडा पाव विकणारा एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ  शकला आणि लोकांच्या घरात वार लावून जेवलेला मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला.

अशी किमया करणारे नेते महाराष्ट्रातच काय पण पूर्ण भारतात फार कमी नेते आहेत. सामान्य माणसाच्या अंतःकरणाला हात घालण्याची किमया असणारे असे एक नेते दक्षिणेत होऊन गेले ते म्हणजे एन.टी. रामाराव. त्यानंतर असा सामान्य माणसाच्या जीवनात चमत्कार घडवणारे नेते म्हणून बाळासाहेबांकडेच पाहिले जाते. नेते अनेक झाले पण मुंबईतले रिक्षावाले, पान टपरीवाले, मासे विकणारे, शिक्षक, हॉटेलात काम करणारे वेटर अशाही अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या भाषेत बोलण्याचे कौशल्य अन्य कोणा नेत्यात नव्हते आणि नाही.

बाळासाहेबांच्या विचारात फार बुद्धीमान माणसाला आकृष्ट करील असे काही नव्हते कारण ते त्या लोकांच्या अवघड भाषेत बोलत नव्हते. ते अगदी सामान्य माणसाला पेलवेल असे साधे बोलत होते. केवळ बोलतच होते असे नाही तर ते या लोकांशी मुंबईच्या शिवाजी पार्कवर तासन तास गोष्टी करीत होते. सामान्य माणसाच्या भाषेत बोलणे हे असामान्यत्वाचे लक्षण होते. त्या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा म्हणजे एक जागतिक पातळीवरचा चमत्कार होता. सतत ४२ वर्षे ते दरसाल नेमके दसर्याभलाच आपल्या अनुयायांना संबोधून बोलत असत. त्याच दिवशी तशीच सभा ४२ वर्षे घेण्याचा विक्रम त्यांना नोंदला होता. आज बाळासाहेब गेलेत म्हणजे या सामान्य माणसाचा आवाज गेला आहे.

बाळासाहेबांनी हात उंचावला तर मुंबई बंद होत असे. या मुंबईवर अशी जादू करणारे जॉर्ज फर्नांडिस,  स.का. पाटील, कॉ. डांगे असे अनेक अनभिषिक्त सम्राट मागे पडले आणि मुंबईवर हुकमत गाजवणारे बाळासाहेब मात्र चार ते पाच दशके हा मान मिळवून बसले. मुंबई महाराष्ट्रातून काढून तिला केन्द्र शासित करण्याचा डाव सरकारने आखला होता पण सरकारच्या या डावाला  बाळासाहेबांनी जनतेच्या रेट्याने उत्तर दिले आणि सरकारचा तसेच काही भांडवलदारांचा हा डाव फसला. याचे पूर्ण श्रेय बाळसाहेबांना आहे. बाळासाहेब ही मुंबईची शान होती. ती शान गेली. मुंबापुरी पोरकी झाली. मुंबईतला मराठी माणूस पोरका झाला.

Leave a Comment