
श्रीनगरचा पहिला मुक्काम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच पहलगामकडे जाण्यासाठी कूच केले. अंतर फक्त ९० किलोंमीटरचे असले तरी घाटाचा रस्ता असल्याने एवढे अंतर कापायलाही चार तास लागतात. त्यातून सगळीकडे पसरलेले आणि क्षणोक्षणी पाय अडकविणारे निसर्गसौंदर्य. पण हा चार साडेचार तासांचा रस्ताही कसा संपतो हे मात्र कळत नाही.

श्रीनगरपासून थोडे पुढे गेल्यावर म्हणजे साधारण तास दीडतास प्रवास केल्यावर खास काश्मीरी केशराच्या बागा लागतात. पांपोर या नावाचे हे चिमुकले खेडे आहे. अर्थात केशराचा सीझन असतो ऑगस्टनंतर. पण येथे रस्त्यांवरच छोटी छोटी दुकाने आहेत, जेथे केशर, सुकामेवा मिळतो. म्हणजे आपल्याकडे नाही का द्राक्षे, पेरू अथवा अंजीरांच्या बागांबाहेरच छोटी छोटी दुकाने उघडून ताजा माल विकतात, तोच प्रकार. आपल्या गाडीचे जे चालक असतात, त्यांची दुकाने ठरलेली असतात.

त्याप्रमाणे त्यात्या दुकानांशी गाड्या थांबविल्या जातात. प्रवाशांना जी खरेदी करायची ती करू दिली जाते. आम्ही खरेदी केली तेथे आम्हाला खास चहा दिला गेला.केशर, बदाम आणि काय काय त्यात घातले होते देव जाणे. पण चव एकदम मस्तच होती. या वैशिष्ठपूर्ण चहाला म्हणतात, कावा.

येथली खरेदी आटोपली की पुढचा प्रवास सुरू. त्यानंतर पुन्हा साधारण एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही थांबलो अवंतीपूरला. अवंतीपूरची भेट कुणीही चुकवू नये अशीच. राजा अवंतीवर्मन याची ही राजधानी. आता केवळ अवशेषरूपाने उरलेली पण तरीही त्याकाळची भव्यता सहज जाणवून देणारी. येथे दोन महाप्रचंड देवळांचे आता नुसते अवशेष आहेत. पूर्ण दगडी बांधणीची आणि लॉकिंग पद्धतीने बांधलेल्या या देवळांचे आवार खरोखर महाप्रचंड आहे.

मोठे देऊळ शिव अवंतीश्वराचे. आता तुटले फुटले असले तरी जे शिल्लक आहे, त्यावरचे कोरीवकामही अप्रतिमच. जुन्या पद्धतीच्या दगडी पायर्यांची चढउतार करून सगळा परिसर फिरायचा तर तब्येत चांगली काटक आणि पाय भक्कमच हवेत. येथेच आँधी सिनेमातील ‘ तेरे बिना जिदगी से कोई शिकवा तो नहीं ‘ या गाण्याचे शूटिंग झाले होते असे सांगतात. येथे एका शीख गाईडने देवळांची फार सुंदर माहिती सांगितली.

पुढचा प्रवास पहलगामच्या दिशेने सुरू झाला. महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे म्हणा की अंतर कमी पडेल म्हणून म्हणा पण आमची गाडी आडरस्त्याला वळली. एकावेळी दोन वाहने जाऊच शकणार नाहीत असा सिगल रोड. पण दोन्ही बाजूंची मोहरीची शेते अशी पिवळीधमक होती की खाली उतरावे आणि अगदी मनसोक्त लोळावे अशी इच्छा होत होती. याच रस्त्यावर महामार्गाला पुन्हा लागताना लागलेले गांव म्हणजे सगळी पडकी, ओसाड घरे. ही सारी काश्मीरी पंडितांची घरे. काश्मीरमधून त्यांना हसकून लावल्यानंतर आता ओसाड बनलेली. मोठमोठी घरे आता पडायला आलेली. मात्र जी अजूनही चांगल्या स्थितीत आहेत, तेथेही कुणी राहात नाहीच. मनाला थोडी विषण्णता वाटली पण थोडे पुढे जाताच या मनाच्या मळभावर अलगद फुंकर घालणारी सफरचंदांची बाग लागली. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना सफरचंदांच्या बागा आहेत. सफरचंदांचा सिझन सुरू होतो तो जुलै ऑगस्टमध्ये. पण आत्ता बागा फुलांनी नुसत्या लगडलेल्या .पाने दिसणार नाहीत इतका बहर. पांढर्या, फिकट गुलाबी रंगाच्या फुलांनी खरोखरच वेडे केले. अगदी नाजूक फुले, चेरीच्या फुलांची आठवण करून देणारी. शिवाय रस्ताभर दोन्ही बाजूंना सलामी देणारी विलोची उंचचउंच झाडे. या झाडाच्या लाकडापासून क्रिकेटच्या बॅटी बनतात. मात्र आता रस्तारूंदीत ही झाडेही तोडली जाणार आहेत असे ड्रायव्हरने सांगितले.

मजलदरमजल करत अखेर पाहोचलो पहलगामला. अनंतनाग जिल्हयातले हे छोटे गांव म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण. साधारण नऊ हजार फूट उंचीवरचे. पहलगाम म्हणजे धनगरांचे खेडे. या गांवात कुठेही उभे राहा. निसर्गाचे विलोभनीय दर्शन झालेच पाहिजे. चहूबाजूंनी हिमशिखरांनी वेढलेले. अगदी नुसते विनाकारण रेंगाळत हिडावे असे हवामान. खळाळत्या नद्यांवरचे छोटे छोटे पूल. येथे वॉटर राफ्टिंगही करतात.

पहलगाम म्हणजे दरवर्षी श्रावणात भरणार्या पवित्र अमरनाथ यात्रेचे प्रवेशस्थळ. सुंदर हॉटेल्स, शांत वातावरण, मधूनच पावसाची भुरभुर आणि हुडहुडी भरविणारी थंडी. पहलगामच्या आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहायला जाताना पहलगामच्याच गाड्या घ्याव्या लागतात. बाहेरच्या वाहनांना बंदी आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठीची ही सोय. पहलगामला पोहोचल्यावर त्या दिवशी आराम करायचा आणि दुसरे दिवशी सकाळी नाश्ता करून निघायचे आसपासची ठिकाणे पाहायला. आम्ही गेलों त्यादिवशी संध्याकाळी पाऊस होताच पण दूर डोंगरात हिमवर्षाव होत होता तो हॉटेलच्या खोलीतूनच छान दिसत होता.हा चांगला योग होता कारण दुसरेदिवशी चंदनवाडीला जायचे होते, तेथे खेळायला भरपूर बर्फ त्यामुळे मिळणार होता. पहिल्यांदा गेलो बेताब व्हॅलीत. सात किलोमीटरवरच्या या दरीत बेताब सिनेमाचे शूटिंग झाले होते म्हणे ! एकीकडे लिडर नदीचा खळाळता प्रवाह. बाजूंनी बर्फाच्या टोप्या खालून सजलेली हिमालयाची शिखरे. व्हॅलीत दूरवर पसरलेली हिरवळीची कुरणे. मधूनमधून वळविलेला कालव्यासारखा छोटा प्रवाह. पाईन, देवदाराची दाट झाडी कसली, जंगलेच. उंचउंच आकाशाशी जणू हातमिळवणी करणारे हे महाप्रचंड वृक्ष काश्मीरचे वैभवच आहे.
बेताब व्हॅलीनंतरचा टप्पा म्हणजे चंदनवाडी. अंतर पहलगामपासून १६ किमी. गाडीतून उतरायचे आणि चक्क बर्फात खेळायलाच जायचे. पवित्र अमरनाथ यात्रेचा प्रारंभ येथून होतो. येथून पुढे साधारण तीन ते चार दिवसांची वाटचाल पायी करत अमरनाथ गुहेपाशी पोहोचायचे. डोळ्यापुढे नुसते चित्र आले तरी गहिवरायला होत होते. ही यात्रा कधी घडेल ते अमरनाथच जाणे. पण दूर कुठेतरी ही गुहा आहे आणि आपण त्या रस्त्यावर आहोत ही भावनाही मनाला खूप समाधान देणारी होती.

चंदनवाडीत पोहोचल्यावर प्रथम काठ्या भाड्याने घेणे, बर्फावरून घसरायला होऊ नये म्हणून गमबूट आणि थंडी वाजू नये म्हणून जाड जाड ओव्हरकोट असा जामानिमा करायचा आणि बर्फात घुसायचेच. मनसोतक्त खेळायचे, घसरायचे, एकमेकांवर बर्फाचे गोळे करून फेकायचे, स्लेजवरून घसरायचे असे सगळे वयाला न शोभणारे प्रकारही सहजतेने केले जात होते. दोन तीन तास कुठे गेले पत्ता नाही.
दुपार उतरतानाच पुन्हा हॉटेलची वाट धरली. दुपारीच येऊन पोहोचलो. आता फक्त गरमागरम सुग्रास जेवण, हॉटेलच्या लाऊंजमध्ये गप्पा आणि आराम. आमच्यापैकी दोघे तिघे बैसरन या मिनी स्वित्झर्लंड म्हणल्या जाणार्या ठिकाणी निघाले. १३ किमीचा हा चढाचा रस्ता घोड्यावरून अथवा पायी पार करायचा. ही मंडळी पायीच गेली आणि चार साडेचार तासांनी अगदी दमून पण तृप्त मनाने परतली. सायंकाळी पुन्हा एकदा पायी पायी गावात उगीचच भटकंती. थोडी फार गरम कपड्यांची खरेदी वगैरे. पुन्हा उद्या उठून गुलमर्गला जायला निघायचे.
