कॉल ऑफ ड्यूटी गेम – विक्रीचा विक्रम

जगात व्हिडीओ गेम प्रकाशित करणारी सर्वात मोठी कंपनी गणल्या गेलेल्या  अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड कंपनीने कालच प्रकाशित केलेल्या कॉल ऑफ ड्यूटी या व्हिडीओ गेमने पहिल्या २४ तासांत ५०० दशलक्ष डॉलर्सची विक्री करून विक्रम नोंदविला आहे. परिणामी कंपनीचा शेअर तीन टक्यांनी वाढला असल्याचे सांगितले जात आहे.

कॉल ऑफ ड्यूटी गेमची तडाखेबंद विक्री ही कंपनीसाठी चांगली न्यूज असल्याचे कंपनीचे वरीष्ठ मिशेल यांनी नमूद केले असून आगामी काळात ही विक्री वेगाने वाढेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की कंपनीने २०११ साली बाजारात आणलेल्या कॉल ऑफ ड्यूटी मॉडर्न वॉरफेअर या गेमनेही पहिल्या २४ तासांत ४०० दशलक्ष डॉलर्सची विक्री नोंदविली होती आणि त्यानंतरच्या १६ दिवसांत ही विक्री १ बिलीयन डॉलर्सवर केली होती. हे रेकॉर्ड कंपनीने आता मोडले असून या गेमसाठी यूके, उत्तर अमेरिका या सर्वात फायदेशीर बाजारपेठा ठरल्या आहेत.

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात मायक्रोसॉफ्टने फाय अॅक्शन शूटर हॅलो- ४ हा व्हिडीओ गेम बाजारात आणला होता आणि पहिल्या चोवीस तासात कंपनीने २२० दशलक्ष डॉलर्सची विक्री नोंदविली होती. त्यातुलनेत अॅक्टिव्हिजनची कामगिरी विशेष ठळकरित्या समोर आली आहे.