राहुल गांधींवर मदार

राहुल गांधी यांच्या कथित भावी पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली तेव्हा राम जेठमलानी यांनी त्यावर आपली टिप्पणी केली. राहुल गांधी हे राजकीय दृष्ट्या निरक्षर आहेत. ते दहा वर्षांपासून खासदार आहेत पण त्यांचे संसदेतले काम काही प्रभावी झालेले नाही असे म्हणत जेठमलानी यांनी गेल्या दहा वर्षातले त्यांचे एक तरी स्मरणात राहणारे वाक्य दाखवून द्या असे आवाहन कले. कदाचित जेठमलानी यांना विस्मरण झाले असेल पण राहुल गांधी यांची काही वाक्ये गाजलेली आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा  प्रचार करताना, तिथल्या जनतेला, मुंबईत जाऊन किती दिवस भीक मागणार असा सवाल केला होता. त्यांचे ते वाक्य इतके गाजले की त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या अनेक मतदारांनी काँग्रेसला मते न देण्याचा निर्धार केला.

या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे होते आणि त्यांच्या करिश्म्यामुळे तिथे काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला आणि तिथली काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाचाने कमी झाली. काँग्रेसला तिथे हाताचा पंजा असा मिळाला. हाताच्या बोटाइतक्या जागा कमी मिळाल्या. राहुल गांधी यांच्या संस्मरणीय वाक्याने काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असे सार्थकी लागले. तामिळनाडूत राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. केरळातही त्यावेळी त्यांनी प्रचार केला. तिथे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री अच्युतानंदन हे होते आणि ते नव्वदीच्या उंबरठ्यावर असूनही पदावर होते. त्याचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी वृद्ध नेत्यांची निर्भत्सना केली.

त्यांचे ते संस्मरणीय वाक्य केरळमध्ये उच्चारलेले होते पण त्याचा परिणाम तामिळनाडूत झाला. तिथे काँग्रेसने द्रमुक पक्षाशी युती केली होती. आणि द्रमुकचे नेते एम. करुणानिधी हेही नव्वदीच्या उंबरठ्यावर आहेत.  मग तामिळनाडून विरोधकांनी प्रश्न विचारला की वृद्ध अच्युतानंद चालत नाहीत मग वृद्ध करुणानिधी कसे चालतात ? हे संस्मरणीय उद्गार काढल्यानंतर राहुल गांधी पुन्हा तामिळनाडूत गेले नाहीत पण त्यांच्या संस्मरणीय उद्गारांनी करायचे ते काम केलेच. तिथे निवडणुकीपूवीं काँग्रेसच्या आमदारांची संख्या ३४ होती ती पाच पर्यंत खाली आली. ३४ वरून ६० पर्यंत जाता येईल आणि तामिळनाडूत पुन्हा पुनर्वैभव प्राप्त होईल अशी स्वप्ने पाहणार्याी काँग्रेस नेत्यांच्या हाती हाताचा पंजाच पडला. पाच जागांवर समाधान मानावे लागले. 

अशीच अवस्था बिहारातही झाली. तिथे पूवीं पाच ‘खासदार’ होते पण राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा सांभाळताच तिथे पाच ‘आमदार’ निवडून आले. काँग्रेसच्या निशाणीच्या हाताच्या पंज्याला पाच बोटे असतात पण त्या पाच आकड्याचा असा प्रभाव पडून काँग्रेसची पाचावर धारण बसावी हे काही योग्य झाले नाही पण जेठमलानी म्हणतात ते खोटे आहे हे सिद्ध झाले. राहुल गांधी हे संस्मरणीय वाक्ये बोलू शकतात आणि त्याचे कसले का होईना परिणाम होतात हे दिसून आले आहे.

आता तर त्यांच्यावर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध समित्यांच्या समन्वयाचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसमध्ये किंवा सरकारमध्ये नेमकी कोणती जबाबदारी येऊन पडणार यावर बरीच चर्चा सुरू होती.  त्यांना भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर आणायचे असेल तर त्यांच्यावर एखाद्या केंद्रीय खात्याची जबाबदारी सोपवली जाईल किंवा त्यांना काँग्रेसचे कार्याध्यक्ष केले जाईल असे तर्क लढवले जात होते. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली किवा काँग्रेस पक्षांतर्गत खांदेपालटाची चर्चा सुरू झाली की, अशा चर्चा आणि अंदाजांना फार ऊत येत असे. मात्र प्रत्येक फेरपालटात राहुल गांधींवर कसलीच जबाबदारी टाकली जात नाही असे प्रत्येक वेळा घडत होते.

त्यामुळे राहुल गांधी जबाबदारी घेण्याची टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्यात ती धमकच नाही, त्यांच्यात ती क्षमता नाही, आत्मविश्वास नाही अशा प्रकारची टीका टिप्पणी होत असे. अशी टीका-टिप्पणी विरोधी पक्षात होणे साहजिक आहे. परंतु गेल्या महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात राहुल गांधींनी कोणतेच खाते घेतले नाही, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच त्यांच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित व्हायला लागल्या. प्रत्यक्षात नेमके काय घडत होते हे कळले नाही. त्यांची क्षमता तशी नाही की, सोनिया गांधी यांची त्यांच्या बाबत काही वेगळी योजना आहे हे काही कळले नाही.

एक मात्र खरे की, भावी पंतप्रधान म्हणून काँग्रेसचे नेते आणि खुद्द सोनिया गांधी त्यांच्याकडे पाहतात. पण  ते देशाचा कारभार पाहू शकतात की नाही, त्यांचे प्रशासन कौशल्य नेमके कसे आहे हे लोकांना दिसले पाहिजे.  त्या दिशेने काहीच घडत नव्हते पण आता मात्र राहुल गांधींची संघटनात्मक क्षमता दाखवून देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. राहुल गांधींच्या क्षमतांचा विचार केला असता त्यांच्यावर सोपविलेली ही जबाबदारी फार मोठी आहे आणि काँग्रेसने ही जबाबदारी सोपवून मोठे धाडस केलेले आहे.

Leave a Comment