मुख्यमंत्रीच हाताळताहेत कायदा सुव्यस्थेचा प्रश्न

मुंबई दि. १७- राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याच्या गृहविभागाची असली तरी सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच गृहविभागाची सूत्रे हाती घेतली असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण आणि त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात पेटलेले शेतकरी आंदोलन अशा दोन आघाड्यांवर सध्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केंद्रीत करावे लागत आहेच पण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही राज्यात कायदा सुव्यवस्था नांदण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे असे आदेश दिले असल्याचेही सूत्रांकडून समजते.

चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या असून दर दोन तासांनी परिस्थितीचा आढावा ते स्वतः घेत आहेत. तासातासाला पोलिस अधिकार्यां्ना अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सध्या बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकृती सुधारत असल्याने प्रशासनावरचा मोठा ताण कमी झाला आहे आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही गरज पडल्यास अतिरिक्त पोलिस फाटा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे असेही सांगण्यात येत आहे.

चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर होत असलेली व्हीआयपी लोकांची वर्दळ आणि बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन तेथील पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्याचे आदेशही दिले असल्याचे समजते.

Leave a Comment