राज्यात अनेक ठिकाणी साखर उत्पादन थंडावले

पुणे दि.१६ – उसाला किमान ३ हजार रूपये दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी छेडलेल्या आंदोलनाचा परिणाम सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर झाला असून या कारखान्यांतील साखर उत्पादन प्रक्रिया कमी झाली असल्याचे समजते. मात्र नांदेड, पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

यावर्षी गळीत हंगामाची सुरवात आक्टोबरच्या मध्यापासून झाली असून हा हंगाम १३ एप्रिलपर्यंत चालणार आहे. गळीत हंगामाच्या पहिल्या महिन्यात ४० लाख टन उस गाळप झाले आहे. यंदा राज्यात ऊसाचा तुटवडा आहे व त्यातून शेतकर्यांाच्या आंदोलनामुळे कारखान्यांना गाळपासाठी उस मिळत नसल्याचे चित्र आहे.

साखर आयुक्त विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा जोर अधिक आहे आणि तेथील शेतकरी उसतोडणी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अन्य भागातून आलेले ऊसतोडणी कामगार आता परतण्याच्या विचारात आहेत. ते परत गेले तर त्यांना पुन्हा आणणे अवघड बनणार आहे. त्यातून गेली दोन वर्षे साखर कारखान्यांनी शेतकर्यांनना उसासाठी जादा दर देण्यास नकार दिल्याने अनेक शेतकरी उस न लावता अन्य पिकांकडे वळले आहेत. त्यातून दुष्काळामुळे ऊस उत्पादनात घट झाली असल्याने यंदा ५४५ लाख टन इतकाच ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.

कारखान्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी गाळप केले तर उत्पादन खर्च वाढतो. आंदोलन लक्षात घेऊन सरकार कारखानदारांना रिटेल बाजारात जादा दराने साखर विक्रीची परवानगी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या राज्यात सहकारी आणि खासगी मिळून ९८ कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्रात गतवर्षी ९० लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यावेळी निर्यातीतून कारखान्यांना जादा मिळकत होण्याची चांगली संधी होती मात्र सरकारने निर्यातीला परवानगी दिली नाही परिणामी कारखान्यांना यंदा ऊसाला जादा भाव देणे परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment