बाळासाहेबांची प्रकृती गंभीर -शिवसैनिकांचा मातोश्रीला गराडा

मुंबई दि.१४ – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बुधवारी रात्री गंभीर बनली असून त्यांच्यावर वांद्रा येथील त्यांच्या घरातच म्हणजे मातोश्रीवरच उपचार सुरू आहेत. बाळासाहेबांना ऑकिसजनवर ठेवण्यात आहे आणि तज्ञ डॉक्टरांचे एक पथकच तेथे तैनात आहे. ८६ वर्षीय शिवसेनाप्रमुख गेले कांही महिने आजारी आहेत.

बुधवारी रात्री दोन वाजता बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे डॉक्टरांनी जाहीर करताच मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची एकच गर्दी उसळली. बॉलिवूड अभिनेते अभिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, संजय दत्त, मान्यता दत्त, नाना पाटेकर यांनी मातोश्रीवर जाऊन तब्येतीची विचारपूस केली तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरच आहेत.

सकाळी पावणेनऊच्या सुमारास बाळासाहेबांचे पुत्र व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर येऊन जमलेल्या शिवसैनिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले तसेच आम्ही आशा सोडलेली नाही, तुम्हीही सोडू नका. बाळासाहेबांसाठी प्रार्थना करा अशी विनंती केली. मातोश्रीबाहेर पोलिस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले असून सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असल्याचे समजते.

Leave a Comment