रांगोळी, दिवे, अभ्यंगस्नान, फराळ

सणासुदीचे दिवस सुरू झालेत… दसरा-दिवाळीत तर काय करू आणि काय नको? असे होऊन जाते. दरवाजाच्या चौकटीपासून ते रांगोळीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या मनाला हव्या तशा सजवण्यात आपला किती वेळ खर्ची जात असेल ना! पण, हे सगळं करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना खूश करण्यातला आनंद काही औरच… दिवाळी आहे आणि आपल्या घराचा दरवाजा रांगोळीने सजला नाही, असे तर होणंच शक्य नाही. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की आपल्या सणांच्या दिवसात रांगोळीचे एवढं महत्त्व का आहे?

तसे पाहायला गेले तर भारतातील प्रत्येक सणांत आणि त्यांच्या परंपरेमध्ये एक गर्भित अर्थ आहे. तसंच रांगोळीचंदेखील आहे… पण, घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही… तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीने विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

रांगोळी म्हणजे भूमी-अलंकरण… भूमीला सजविण्यासाठी, देवघरातील देव्हारा, अंगण, भोजनाची पंगत, शुभकार्यस्थळ इत्यादी जागा सुशोभित करण्यासाठी रांगोळी, तांदळाची पिठी, खडू, शिरगोळ्याचे किंवा संगमरवराचा भुकटी, चुन्याची भुकटी, भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, मीठ, पानं, विविध धान्ये अशा विविध गोष्टींनी रांगोळी काढली जाते. आणि त्यात वेगवेगळे रंग भरून ती सुशोभित केली जाते.

आपले जीवनही अशाच वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले असावं, ही त्यामगची इच्छा आणि मागणी. धार्मिक, सांस्कृतिक समारंभ प्रसंगी, शुभकार्य प्रसंगी घरासमोर, अंगणात, उंबर्यामवर, देवघरासमोर, चौरंग वा पाटाभोवती रांगोळी रेखाटली जाते. पूजापाठ, यज्ञ, अभ्यंगस्नान, औक्षण, नामकरण, भोजन अशा सर्व प्रसंगी सर्वप्रथम रांगोळी काढणे भारतात सर्वत्र प्रचलित आहे.

आता समजले का… सणांच्या दिवसांत रांगोळी का महत्त्वाची आहे ते… मग, आता जेव्हा तुम्ही या दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर बसून रांगोळी रेखाटत असाल तेव्हा हे लक्षात असू द्या की तुम्ही फक्त घराची सजावट करत नाही तर तुम्ही तुमच्या संपूर्ण घराला आणि कुटुंबीयांना एका सकारात्मक ऊर्जेमध्ये घेऊन जाताय. शिवाय यासाठी तुम्ही रासायनिक रंगांचा वापर न करता प्राकृतिक रंगांचा जेवढा जास्त वापर कराल तेवढं चांगले… कारण हे रासायनिक रंग तुमच्या त्वचेला हानिकारकही असतात.

भाऊबीजेचे महत्व
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ’बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे.

आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ’ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी. बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.

दिवाळीचे महत्व
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या(लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुतः ते सण वेगवेगळे आहेत.

जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे. पंचतत्त्वांच्या शुद्धीसाठी, तसेच त्रिदोषांच्या शुद्धीसाठी पंचकर्माची योजना केली, तर मग पंचकर्मासारखे वा विरेचनासारखे आयुर्वेदिक उपचार मनुष्य का करून घेत नाही?

दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र
कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी धार्मिक कृती करतात.बलीप्रतिपदा बली राजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात. अशा तर्हेने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असे आपली संस्कृती सांगते.

चातुर्मासाच्या काळात तेजतत्त्वाचा अभाव असल्यामुळे तेजोमय शक्तीतून विघटित होत असलेले घटक जास्त प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते. दिवाळीच्या काळापर्यंत या घटकांची विपुल प्रमाणात वृद्धी झालेली असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राक्षसांचे साम्राज्य या काळात वाढायचे. या सर्व घटकांचे सूक्ष्म स्तरावर क्षमन व्हावे; म्हणून दिवाळी केली जाते, म्हणजेच तेजतत्त्वावर आधारित उपासना केली जाते. या प्रकारच्या उपासनेमुळे तेजाच्या अभावी वाढलेल्या त्रासदायक घटकांचा तेजाच्या बलावर नाश होतो.

दीपावलीच्या सायंकाळी घरात व घराबाहेर दिव्यांची ओळ लावावी. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. यामुळे घराला अप्रतिम शोभा निर्माण होऊन उत्साह येतो व आनंद होतो. विजेच्या दिव्यांची माळ लावण्यापेक्षा तेल व वातीच्या पणत्या लावण्यात शोभा व शांतपणा जास्त आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल व वात यांची ज्योत. ’अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा’, अशी श्रुतीची आज्ञा आहे – ’तमसो मा ज्योतिर्गमय’.

या तीन दिवसांत ज्यांच्या घरी दिवे लागत नाहीत त्यांच्या घरी नेहमीच अंधकार रहातो. ते प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीत. दीपदानाने लक्ष्मी स्थिर होते. आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास व ज्ञानाचा प्रकाश असावा यासाठी प्रत्येकाने आनंदाने दीपावली उत्सव साजरा करावा. याने घरात सुखसमृद्धि रहाते.

आकाशकंदिल
हा दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे. आश्विन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्याला आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधि पुढीलप्रमाणे असतो. घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीचा खांब पुरावा. तो वस्त्र, पताका,अष्टघंटा,कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृति दीप (कंदिल) करून अडकवावा.

त्या दीपात(कंदिलात) मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूति, दामोदर, धर्मराज,प्रजापति,पितर(तमःस्थित) व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.

दामोदराय नभसि तुलायां लोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ।।

अर्थ ः श्रेष्ठ असा परमेश्वधर जो दामोदर,त्याला हा ज्योतीसह दीप अर्पण करतो. त्याने माझे कल्याण करावे. याचे फल लक्ष्मीप्राप्तिच हे आहे.’

फटाके
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण रात्री फटाके वाजवतात व आतषबाजी करतात.

अभ्यंगस्नान
नरक चतुर्दशी ते बलिप्रतिपदा हे दीपावलीचे तीनही दिवस रोज अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे व नंतर ऊनपाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. नेहमीच्या स्नानाचा प्रभाव सुमारे तीन तास टिकतो तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच तास टिकतो. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते म्हणून तेल लावायचे. ऊनपाणी हे मंगल व शरीराला सुखदायक आहे म्हणून ऊनपाण्याने स्नान सांगितले आहे. तेल लावून नंतर स्नान करण्याने त्वचेला व केसांना आवश्यक तेवढाच ओशटपणा रहातो; म्हणून स्नानापूर्वी तेल लावणे आवश्यक आहे. स्नानानंतर तेल लावणे उचित नाही.

अभ्यंगस्नान करतांना देशकाळकथन करावे लागते. देशकाळकथनाची भारतीयांची पद्धति वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षे झाली, कोणत्या वर्षातील कोणते व कितवे मन्वंतर चालू आहे, या मन्वंतरातील कितवे महायुग व त्या महायुगातील कोणते उपयुग चालू आहे, या सर्वांचा त्यात उल्लेख असतो. याप्रमाणे देशकाळकथन करावयाचे असते. यावरून यापूर्वी केवढा मोठा काळ गेला आहे व राहिलेला काळही केवढा मोठा आहे याची कल्पना येते.

आपण फार मोठे आहोत असे प्रत्येकाला वाटत असते; पण आपण किती लहान व सूक्ष्म आहोत याची कल्पना या विश्वाकच्या अफाट काळावरून येते. यामुळे माणसाचा गर्व नाहीसा होतो. हा मोठा फायदा आहे.’
वर्षातून पुढील पाच दिवस असे अभ्यंगस्नान करण्यास शास्त्रात सांगितले आहे

१. संवत्सरारंभ

२. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा

३. दिवाळीचे तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा.

पूर्वी, दीपावलीचा महोत्सव असो, वा घरात यज्ञयाग, लग्न वगैरे मोठा प्रसंग असो, शरीरशुद्धी प्राधान्याने केली जात असे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या शरीररूपी घरात राहते, नंतर हे शरीर चुना-माती-विटांनी बांधलेल्या घरात राहते. नुसतेच माती-विटांच्या घराला चांगले ठेवणे योग्य नाही; पण कालमहिमा असा की, फक्त बाह्य आवरणाला व वरवरच्या दिखाव्याला व देखाव्यालाच महत्त्व आल्यानंतर शरीर हे आत्म्याचे खरे घर असल्याचे विस्मरणात गेले असावे.

शरीराची नुसतीच शुद्धी करून चालत नाही तर शरीरावर तेज दिसेल, लोक आकर्षित होतील, त्यातून एकमेकांशी चांगले संबंध जुळतील व ती व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटेल याचीही आवश्यकता असते. मायकेल जॅक्सीन, एलव्हिस प्रेस्ली, सध्या प्रसिद्ध असलेली पॉप गायिका लेडी गागा; तसेच काही भारतीय चित्रपटांतून दाखविलेल्या नृत्यांमध्ये नृत्य करणार्याीच्या पोशाखाला छोटे छोटे विजेचे दिवे लावून नृत्य करणार्या;चे शरीर आकर्षक केलेले दिसते. म्हणजे शरीर आकर्षक करून इतरांना दृष्टिसुख देणे आवश्यक असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. असे असताना शरीरशुद्धी करून शरीराची कांती व तेज वाढेल अशी उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दीपावलीचा महोत्सव सुरू केलेला असावा.

एक गोष्ट निश्चित, की नुसत्या शरीरशुद्धीने येणारे तेज चारी दिशांना फाकण्यास असमर्थ ठरेल,त्यासाठी विशेष आहार व रसायनाची व्यवस्था करावी लागेल. याच उद्देशाने दीपावली महोत्सवात खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. दिवाळीच्या फराळात असणार्या  अनारसे, करंजीसारख्या पदार्थांमुळे वीर्यवृद्धी पर्यायाने तेजवृद्धी होतेच.

Leave a Comment